मुंबई – कोव्हिशिल्ड लशीचे क्वचित प्रसंगी मानवी शरीरावर दुष्परिणामही होऊ शकतात, अशी कबुली अॅस्ट्राझेनेकाने प्रथमच ब्रिटनमधील एका न्यायालयात दिली. भारतामध्ये अॅस्ट्राझेनेका-ऑक्सफोर्ड विद्यापीठ आणि सिरम इन्स्टिट्यूट यांनी मिळून ही लस तयार केली होती. भारतीय बनावटीची ही लस फक्त भारतातच नव्हे, तर इतर अनेक देशांमध्येही पुरविण्यात आली होती. अॅस्ट्राझेनेकाच्या कबुलीनंतर आता सिरम इन्स्टिट्यूट विरोधात न्यायालयात जाण्याचा निर्णय एका मृत मुलीच्या पालकांनी घेतला आहे. हे संपूर्ण प्रकरण काय आहे? हे जाणून घेऊ या.
रितिका श्री ओम्त्री (वय १८) या मुलीने मे २०२१ मध्ये कोव्हिशिल्ड लशीचा पहिला डोस घेतला होता. त्यावेळी तिने नुकतीच बारावीची परीक्षा उत्तीर्ण करून आर्किटेक्चरचा अभ्यास सुरू केला होता. मात्र लस घेतल्यानंतर सात दिवसातच तिला ताप आला. उलट्या आणि अशक्तपणा आल्यामुळे तिला साधे चालताही येत नव्हते. रितिकाला रुग्णालयात दाखल केल्यानंतर तिचा एमआरआय रिपोर्ट काढण्यात आला. ज्यामध्ये तिच्या डोक्यात रक्ताच्या गुठळ्या झाल्याचे निदर्शनास आले. डोक्यात रस्तस्त्राव झाल्यामुळे दोन आठवड्यातच रितिकाचा मृत्यू झाला. रितिकाच्या पालकांना या घटनेमुळे प्रचंड हादरा बसला, पण त्यांनाही त्यावेळेस मृत्यूचे कारण कळले नाही. मात्र त्यांनी माहितीच्या अधिकाराचा वापर करून तिच्या मृत्यूचे कारण तपासण्याचा निर्णय घेतला. डिसेंबर २०२१ मध्ये त्यांना कळले की, रितिकाला ‘थ्रोब्मोसिस विथ थ्रोम्बोसायटोपेनिया’ (TTS) हा आजार होता. लस घेतल्यानंतर दुष्पपरिणाम होऊन तिचा मृत्यू झाल्याचे पालकांना कळले.