ठाणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राम मंदिराची उभारणी केली. कलम 370 हटविले. मागील दहा वर्ष एक ही सुट्टी न घेता पंतप्रधान मोदी यांनी काम केले. त्यांचा जन्म राष्ट्रनितीसाठी झालाय. मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यास जनता आतूर झाली आहे. मोदीजी यांना हरवणे सोपे नाही तर केवळ अशक्य आहे, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. आईचे दुःख बाजूला ठेवत देशसेवा करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी कुठे आणि दुसऱ्या बाजूला आईचा पदर पकडून राजकारण करणारा राहुल गांधी कुठे हा फरक जनतेला ओळखला आहे, अशी टीका त्यांनी यावेळी केली.
ठाणे टेंभी नाका येथील आनंद आश्रममध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत माजी खासदार संजय निरुपम आणि काँग्रेसच्या शेकडो कार्यकर्त्यांनी आज शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी संजय निरुपम आणि काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश केलेल्या पदाधिकाऱ्यांचे स्वागत केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, संजय निरुपम यांच्या शिवसेनेत येण्याने काँग्रेस रिकामी झाली आहे. त्यांच्या अनुभवाचा फायदा शिवसेनेला नक्की होईल. त्यांच्यासोबत आलेल्या सर्व कार्यकर्त्यांचा पक्षात सन्मान राखला जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.
मुंबई हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर आहे. त्यादृष्टीने इतकी वर्ष सत्तेत असणाऱ्यांनी या शहराचा विकास करायला पाहिजे होता. मात्र दुर्दैवाने त्यांनी मुंबईकरांचा विचार केला नाही. त्यांनी फक्त स्वतःचा विचार केला, असा घणाघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उबाठा गटावर केला.
संजय निरुपम यावेळी म्हणाले की, बाळासाहेबांच्या विचारानुसार काम करताना काँग्रेसमध्ये अडचण येत होती. ती अडचण आता दूर झाली आहे. शिवसेनेला मजबूत करण्यासाठी पक्षात प्रवेश केला आहे. २० वर्षानंतर कुटुंबासह स्वगृही परत येत आहे. महायुतीच्या मुंबईतील सहा जागा निवडून येणार, असा विश्वास संजय निरुपम यांनी व्यक्त केला.
————————-
सर्व कोळीवाड्यांमध्ये फूड प्लाझा
पर्यटनाला चालना देण्यासाठी मुंबईतील सर्व कोळीवाड्यांची स्वच्छता करून त्याठिकाणी माहीम कोळीवाड्याच्या धर्तीवर फूड प्लाझा सुरु करण्याची सूचना महानगरपालिका आयुक्तांना केली असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगतिले. कोळीवाड्यांमध्ये उद्योग सुरु होत आहेत. आपण कोळीवाड्यांचा विकास हाती घेतला आहे. कोस्टल रोड प्रकल्पातील बोटी जाण्यासाठी दोन खांबांमधील अंतर ६० मीटरवरुन १२० मीटर केले. त्यामुळे आपल्या डायरीत होणार नाही हा शब्द नसल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
———