अहमदनगर- महाराष्ट्राला हादरवणाऱ्या कोपर्डी बलात्कार प्रकरणातील आरोपीच्या चुलतभावाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. कोपर्डी प्रकरणातील पीडित तरुणीच्या नातेवाईकांनी मारहाण करून रात्रभर नग्नावस्थेत स्मशानभूमीत बसवले. या प्रकारामुळे आपण अपमानीत झाल्याने आत्महत्या करत असल्याचे मृत तरुणाने चिठ्ठीत लिहिले आहे. या घटनेनंतर कोपर्डीत पुन्हा एकदा तणाव निर्माण झाला असून, पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
विठ्ठल उर्फ नितीन शिंदे (37) असे या आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 1 मे रोजी महाराष्ट्र दिनाच्या दिवशी कोपर्डी गावात भैरवनाथ यात्रा होती. या यात्रेत तमाशाच्या फडाशेजारी नाचण्यावरून विठ्ठल आणि आरोपींमध्ये जोरदार वाद झाला. यावेळी स्वप्निल सुद्रिक, वैभव सुद्रिक आणि बंटी सुद्रिक यांनी नितीनला मारहाण केली. तसेच त्याला शिवीगाळ करत नग्न करून स्मशानभूमीत बसवले. ही माहिती गावकऱ्यांकडून तरुणाच्या वडिलांना कळली. मुलाची चौकशी करण्याकरता त्याच्या घरी गेल्यानंतर रात्रभर नवरा घरी न आल्याचे त्याच्या पत्नीने सांगितले. त्यानंतर शोधाशोध केल्यानंतर स्मशानभूमीत असल्याचे तरुणाच्या लहान भावाने सांगितले. त्यानंतर कुटुंबियांनी स्मशानभूमीत धाव घेतली. त्यावेळी तरुणाने घडलेला प्रसंग सांगितला. तमाशात नाचलो म्हणून म्हणून आपल्याला जातिविषयक शिवीगाळ केली. नंतर घरी परतत असताना आरोपींनी मारहाण केली. तसेच मोबाईल, पैसे,कपडे काढून घेतल्याने स्मशानभूमीत रात्र काढावी लागल्याची हकिगत त्याने सांगितली.
आत्महत्या केलेल्या तरुणाच्या वडिलांनी या प्रकरणी पोलिस कर्जत पोलिस स्थानकात तक्रार केली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी विठ्ठलने चिठ्ठी लिहिली असून त्यात आपल्यासोबत घडलेला प्रसंग लिहिला आहे. या चिठ्ठीत स्वप्निल सुद्रिक आणि बंटी सुद्रिक हेच माझ्या आत्महत्येला जबाबदार असल्याचे म्हटले आहे. त्यानंतर पोलिसांनी आरोपींविरोधात आत्महत्येस प्रवृत्त करणे व ट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला असून बंटी सुद्रिक व वैभव सुद्रिक यांना ताब्यात घेतले आहे. बंटी बुद्रिक हा कोपर्डीतील बलात्कार पिडितेचा नातेवाईक आहे.तर विठ्ठल कोपर्डी बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपी पप्पू शिंदेचा हा चुलतभाऊ आहे. कोपर्डी प्रकरणात पप्पूला फाशीची शिक्षा झाल्यानंतर त्याने तुरुंगात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. पप्पूच्या घरी म्हणजे आपल्या चुलत्याच्या घरीच नितीनने आत्महत्या केली. कोपर्डीमध्ये 13 जुलै 2016 रोजी अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून निर्घृण हत्या करण्यात आली होती.या हत्या प्रकरणातील सर्व तीनही आरोपींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती.