हैदराबाद – भारतातील नागरी पुरस्कारांमध्ये प्रतिष्ठेचा मानला जाणारा पद्म श्री पुरस्कार मिळालेले लोकगीत गायक दर्शनम मोगुलय्या यांची आर्थिक स्थिती अत्यंत हलाखीची झाली आहे. उदरनिर्वाह चालविण्यासाठी मोगुलय्या हैदराबादमध्ये एका बांधकाम प्रकल्पावर रोजंदारीवर मजुरी करीत आहेत.
किन्नरा या काळाच्या ओघात नामशेष झालेले पारंपरिक वाद्याला मोगुलय्या यांनी पुन्हा लोकाश्रय मिळवून दिला. या त्यांच्या कार्यासाठी मोगुलय्या यांना २०२२ साली केंद्र सरकारने पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित केले होते.किन्नरा मोगुलय्या अशी आपली स्वतंत्र ओळख त्यांनी बनवली. पद्मश्रीसारखा किताब मिळविल्याबद्दल तेलंगणा सरकारने त्यांना १ कोटी रुपयांचा रोख पुरस्कार दिला होता. ते सर्व पैसे मोगुलय्या यांनी कौटुंबिक गरजांवर खर्च केले. केंद्र सरकारच्या वतीने त्यांना दरमहा १० हजार रुपयांचे मानधन दिले जात होते. तेही आता बंद करण्यात आले आहे. त्यामुळे वयाच्या ७३ व्या मोगुलय्या दोन वेळच्या अन्नासाठी रोजंदारीवर मजुरी करण्याची नामुष्की ओढवली आहे.
एका इंग्रजी वृत्तपत्राने मोगुलय्या यांची ही करुण कहाणी जगासमोर आणली. मोगुलय्या यांना नऊ मुले होती. त्यापैकी तीन मुले आजारपणामुळे दगावली.तीन मुले विवाहित आहेत.एक मुलगा गंभीर आजाराने ग्रस्त आहे. त्याच्या आणि आपल्या स्वतःच्या औषधोपचारासाठी मोगलय्या यांना दरमहा सुमारे ७ हजार रुपयांची गरज भासते. त्यांची तीन मुले अजून शिक्षण घेत आहेत. तीदेखील मोगलय्या यांच्यावरच अवलंबून आहेत. मोगुलय्या यांच्या पत्नीचे चार वर्षांपूर्वी निधन झाले. मोगुलय्या सांगतात की, त्यांनी गायक म्हणून काम मिळवण्यासाठी अनेकांचे उंबरठे झिजवले. त्यांना आपली करुण कहाणी ऐकवली. सर्वांनी त्याच्याबद्दल सहानुभुती व्यक्त केली. पण काम मात्र कोणीच दिले नाही.शेवटी नाईलाजाने मोगुलय्या यांना बांधकाम मजूर म्हणून काम करावे लागले.