डोंबिवली – कल्याण लोकसभेला एक आदर्श, काम करणारा, संसदरत्न पुरस्कार प्राप्त खासदार मिळाला आहे. गेल्या १० वर्षांत डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केलेल्या कामाची पोचपावती आजच्या मिरवणुकीत नागरिकांनी दिलेली आहे. त्यामुळे डॉ. श्रीकांत शिंदे यांना आपण आता थेट विजयाच्या आणि हॅटट्रिकच्या शुभेच्छा देऊया, असे म्हणत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कल्याण लोकसभेचे महायुतीचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला. डॉ. श्रीकांत शिंदे यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासह महायुतीचे आमदार आणि नेते आज डोंबिवलीत उपस्थित होते. अर्ज भरण्यापूर्वी काढण्यात आलेल्या भव्य मिरवणुकीत हजारोंच्या संख्येने नागरिक या उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.
उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थितांना संबोधित केले. कल्याण लोकसभेच्या विकासासाठी निधीची कुठलीही कमी भासू देणार नाही याची खात्री मी देतो, असे यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले. कामाच्या माध्यमातून डॉ. श्रीकांत शिंदे यांनी स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी सांगितल्याप्रमाणे बूथ लेव्हलला काम करा आणि बूथ जिंका. मतदान वाढेल असे काम केले पाहिजे, तरच डॉ. श्रीकांत शिंदे यांना मताधिक्याचा रेकॉर्ड मोडता येईल, असे आवाहन यावेळी शिंदे यांनी केले. उन्हाळी सुट्टी आणि लग्न सराईमध्ये काही लोक गावी गेले आहेत. त्या सर्वांना विनंती करून डॉ. श्रीकांत शिंदे यांना मतदान करा, असे आवाहन करायचे आहे. तरच नवा विक्रम आपण नोंदवू. डॉ. श्रीकांत शिंदे यांना मत म्हणजे मोदीजींना मत, धनुष्यबाणाला मत म्हणजे मोदींना मत, महायुतीला मत म्हणजे मोदीजींना मत आहे. त्यामुळे आपण सगळ्यांनी २० तारखेपर्यंत मेहनत करायची आहे. २० तारखेनंतर पुढील ५ वर्ष खासदार मेहनत करतील आणि मतदारसंघाची सेवा करतील, असेही मुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले.
त्यापूर्वी ठाणे येथील निवासस्थानी औक्षण करून वडिलधाऱ्यांचे आशिर्वाद घेत डॉ. श्रीकांत शिंदे डोंबिवलीकडे रवाना झाले. डोंबिवलीचे ग्रामदैवत असलेल्या श्री गणेश मंदिरात जात डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सपत्नीक दर्शन घेत आपल्या रॅलीला सुरूवात केली. आप्पा दातार चौकातून डोंबिवली शहराच्या मध्यवर्ती भागातून लोकमान्य टिळक चौकामार्गे संत सावळाराम महाराज क्रीडा संकुलापर्यंत ही रॅली निघाली. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, मनसेचे कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील, शिवसेनेचे ओवळा-माजीवडा मतदारसंघाचे आमदार प्रताप सरनाईक, अंबरनाथचे आमदार डॉ. बालाजी किणीकर, कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे, कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथ भोईर, माजी आमदार रविंद्र फाटक, शिवसेनेचे प्रवक्ते आणि ठाणे लोकसभेचे उमेदवार नरेश म्हस्के, भाजपाचे मुरबाडचे आमदार किसन कथोरे, उल्हासनगरचे आमदार कुमार आयलानी, शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे, माजी मंत्री जगन्नाथ पाटील, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव, ठाणे आनंद परांजपे, रिपाइंचे जिल्हाध्यक्ष प्रल्हाद जाधव यांच्यासह शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, पिपल्स रिपब्लिकन पार्टी, राष्ट्रीय समाज पक्ष आणि मित्र पक्षांचे सर्व प्रमुख नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.