शिर्डी – ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी काही दिवसांपूर्वी भाजपमध्ये घरवापसी करण्याचा निर्णय घेतला. मात्र अजून त्यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश झालेला नाही. त्यातच एकनाथ खडसे यांनी त्यांच्या सुनबाई रक्षा खडसे यांचा प्रचार रावेर लोकसभा मतदारसंघात सुरु केला आहे. यावरून मंत्री गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसेंवर निशाणा साधला आहे. तसेच ग्रीष महाजन यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावरही टीका केलीय. गिरीश महाजन म्हणाले की, एकनाथ खडसे हे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार आहेत. खडसे यांनी अगोदर आमदारकीचा राजीनामा द्यावा. त्यानंतर त्यांनी भाजपचे काम करावे. लोकांमध्ये गैरसमज निर्माण होतोय. कधी म्हणतात मी राष्ट्रवादीचा तर कधी म्हणतात मी भाजपचा आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील भाजपच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे या विखे पाटलांवर नाराज असल्याच्या चर्चा सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर गिरीश महाजन यांनी स्नेहलता कोल्हे यांची भेट घेतली. यावर गिरीश महाजन म्हणाले की, स्नेहलता कोल्हे यांच्याशी सतत संपर्क सुरु आहे. देवेंद्र फडणवीस हे देखील कोल्हेंशी बोलले आहेत. काही गोष्टी असतात, मात्र त्या नाराज नाहीत. चर्चेअंती सर्व नाराजी दूर झालीय. कोपरगाव मतदारसंघातून चांगलं मताधिक्य महायुतीच्या उमेदवाराला मिळेल, असा विश्वास गिरीश महाजनांनी यावेळी व्यक्त केलाय.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उद्धव ठाकरे हे काही माझे शत्रू नाहीत असे म्हटले. यावर गिरीश महाजन म्हणाले की, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आणि भाजपचे ऋणानूबंध होते. आम्ही सन्मानाने मातोश्रीवर जायचो. आता उध्दव ठाकरेंना दररोज तीन ठिकाणी फिरावे लागते. कधी राष्ट्रवादी तर कधी काँग्रेसच्या ऑफिसला जावे लागते. उद्या प्रकाश आंबेडकरांनी बोलावले तर त्यांच्याही ऑफिसला जावे लागेल. उध्दव ठाकरेंनी इतकी वाईट स्थिती स्वतःवर ओढावून घेतली आहे. मोदीजी राजकीय नाही तर वैयक्तिक कामात ठाकरे कुटुंबाला मदत करतील. मात्र उध्दव ठाकरेंनी केलेली चूक अक्षम्य आहे. त्याचा फटका उद्धव ठाकरेंना बसणारच आहे, असे गिरीश महाजन यांनी म्हटले आहे.