राज्यातील 22 जिल्ह्यांमध्ये गर्भलिंग निदान, गर्भपात होत असल्याचं समोर

0

मुंबई – पुरोगामी राज्य अशी महाराष्ट्राची ओळख सांगितली जाते, महिलांना त्यांचे हक्क देणारं राज्य म्हणून ओळख आहे. पण समोर आलेली एक माहिती महाराष्ट्राला मान खाली घालायला लावणारी आहे. राज्यातील 22 जिल्ह्यांत मुलांच्या तुलनेत मुलींची संख्या चिंता वाटावी एवढी कमी झालेली आहे. राज्यात बंदी असूनसुद्धा गर्भलिंगनिदान आणि गर्भपात जोरात सुरु असल्याचं हे निदर्शक आहे. राज्याच्या आरोग्य विभागाच्या पत्रातून ही चिंता व्यक्त करण्यात आली आहे.

विज्ञान, क्रीडा, अवकाश, राजकारण, अर्थ, उद्योग असं कुठलंही क्षेत्र नाही जिथं महिलांनी संधी मिळाल्यावर पुरुषांएवढंच कर्तृत्व दाखवलं नाही. कष्ट आणि सातत्यामध्ये तर महिलांचा कुणी हात धरु शकत नाही. 21 व्या शतकात पुरुषांच्या बरोबरीनं महिला धावत आहेत. तरीसुद्धा समाजातले बुरसटलेले विचार अजून कायम आहेत. मुलगाच हवा हा हट्ट अजूनही जाता जाईना झाल्याचं चित्र आहे.

राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्भलिंग निदान आणि मुलींचे गर्भपात होत असल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी एका पत्रात याबाबत माहिती नमूद केली आहे. त्यामुळे या 22 जिल्ह्यांमध्ये लिंग गुणोत्तरचे प्रमाण म्हणजे एक हजार मुलांमागे मुलींचे प्रमाण चिंतादायकरीत्या घटल्याचे समोर आले आहे. तर जालन्यात सर्वाधिक मुलींचे प्रमाण कमी झाल्याने चिंता व्यक्त करण्यात आली आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech