‘उद्धव ठाकरेंना मोदींची मदत घेण्याची वेळ येऊ नये’, पवारांचं सूचक विधान

0

मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसंदर्भात मवाळ भूमिका घेतल्याचं चित्र पाहायला मिळालं. पंतप्रधान मोदींची ही भूमिका म्हणजे ठाकरेंशी जुळवून घेण्याच्या प्रयत्नांचा भाग आहे की काय अशी चर्चा राजकीय वर्तुळात दबव्या आवाजात सुरु झाली आहे. असं असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांनी मात्र मोदींनी केलेल्या विधानावरुन खोचक प्रतिक्रिया नोंदवली आहे. शरद पवार यांना पत्रकारांनी मोदींनी आपण उद्धव ठाकरेंच्या मदतीला ठाऊन जाणारी पहिली व्यक्ती असू असा संदर्भ देत प्रश्न विचारला असता त्यावर खास आपल्या शैलीत उत्तर दिलं.

पंतप्रधान मोदींनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये ठाकरे कुटुंबाबरोबरच्या नात्याबद्दल भाष्य केलं. ‘उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत. उद्या संकट आले तर त्यांच्या मदतीला धावून जाणारा मी पहिला माणूस असेल,’ असं पंतप्रधान मोदी एका भाषणात म्हणाले. उद्धव ठाकरेंच्या शस्त्रक्रीयेच्या वेळी आपण फोनवर वारंवार त्यांची चौकशी केल्याचा दावाही पंतप्रधान मोदींनी केला. इतकेच नाही तर शस्त्रक्रीया करण्याआधी आपण शस्त्रक्रीया करावी की नाही याबद्दल ठाकरेंनी सल्लासलत केली होती असंही मोदींनी म्हटलं. रश्मी वहिनींकडून आपण उद्धव ठाकरेंच्या प्रकृतीसंदर्भातील माहिती वेळोवेळी घेत होतो, असंही मोदींनी यावेळेस आवर्जून सांगितलं.

उद्धव ठाकरे आपले शत्रू नसून त्यांना काहीही मदत लागली तर त्यांच्या मदतीला धावणारी पहिली व्यक्ती आपण असू असं पंतप्रधान मोदी मुलाखतीत म्हणाल्याचा संदर्भ देत शरद पवारांना प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना शरद पवारांनी, ‘त्यांनी लाख म्हटलं असेल. पण आमची प्रार्थना ही आहे की उद्धव ठाकरेंना यांची मदत घ्यायची वेळ येऊ नये,’ असा टोला लगावला.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech