मुंबई – आषाढी एकादशीच्या निमित्ताने, संत ज्ञानेश्वर महाराजांच्या आळंदी ते पंढरपूर पालखी सोहळ्याचे वेळापत्रक आळंदी देवस्थानच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे. २९ जून शनिवार संध्याकाळी ४ वाजता माऊलींच्या पालखी संजीवन समाधी मंदिरातून पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करणार आहे. पहिला मुक्काम हा माऊलींचे आजोळ असलेल्या गांधी वाड्यात होणार आहे. तर ३० जून रविवार रोजी पालखी आळंदीहून पुण्याच्या दिशेने मार्गस्थ होणार आहे.
१५ जुलैला पालखी वाखरीला पोहचणार आहे. तर १६ जुलैला वाखरी ते पंढरपूर असा प्रवास होईल. १७ जुलै रोजी मुख्य आषाढी एकादशी पंढरपूर यात्रेचा सोहळा असणार आहे. दरम्यान, पहिले उभे रिंगण ८ जुलै चांडोबाचा लिंब, पहिले गोल रिंगण १२ जुलै पुरंद वडे, दुसरे गोल रिंगण १३ जुलै खुडुस फाटा, तिसरे गोल रिंगण १४ जुलै ठाकूर बुवाची समाधी, दुसरे उभे रिंगण १५ जुलै बाजीरावाची विहीर, चौथे गोल रिंगण १५ जुलै बाजीरावाची विहीर, तिसरे उभे रिंगण १६ जुलै वाखरी पादुका आरती, असा रिंगण सोहळा असणार आहे. तसेच २० जुलैपर्यंत माऊलींची पालखी पंढरपूर नगरीत विसावेल. २१ जुलैला श्रींचे चंद्रभागा स्नान, गोपाळपूर काला व श्री विठ्ठल रुक्मणी भेट , पादुका जवळ विसावा व सोहळा परतीच्या प्रवासासाठी आळंदीकडे निघणार आहे.