(अजय निक्ते)
शाहू ,फुले,आंबेडकर असे पुरोगामीत्वाचे ढोल कितीही पिटले तरी निवडणुकीच्या राजकारणात जातीचे समीकरणच नेहमी महत्त्वाचे ठरते हेच सत्य आहे. भिवंडी मतदारसंघ देखील याच कारणासाठी अत्यंत संवेदनशील म्हणून गणला जातो. या मतदारसंघाची ओळख मुस्लिम बहुल मतदारसंघ अशी जरी असली तरी इथे सर्वात जास्त प्राबल्य मात्र कुणबी मतदारांचे आहे. तसेच आगरी मतदार देखील इथे लक्षणीय आहेतच. त्यामुळे दोन आगरी आणि एक कुणबी जातीच्या उमेदवारांमध्ये होणारी इथली चुरशीची लढत जाती साठी कोणाची माती करते हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
पूर्वी या मतदारसंघाचा समावेश डहाणू लोकसभा मतदारसंघात होता. २००८ साली भिवंडी लोकसभा मतदारसंघ अस्तित्वात आला. या शहराला ऐतिहासिक महत्त्व असून, कापड उद्योग आणि पॉवरलूम यामुळे राज्यातच नाही तर देशाच्या व्यापारात भिवंडी ओळखली जाते. आता तर आशियातील सर्वात मोठी वेअरहाऊसिंग हब सिटी म्हणून भिवंडीचा नावलौकिक आहे. ताज्या आकडेवारीनुसार भिवंडी मतदारसंघात २०,३९,४५९ मतदारांची नोंद झाली आहे. १८ ते २९ या वयोगटातील , तब्बल ४,१४,०४८ इतके युवा मतदार या मतदारसंघात आहेत. पुरुष मतदारांची ११,०५,३११ तर महिला मतदारांची ९,३३,८१० इतकी संख्या भिवंडी मतदारसंघात आहे. या लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मिळून १०४१ ठिकाणांवर एकूण २१८९ मतदान केंद्रे आहेत.
सहा विधानसभासंघनिहाय विचार केल्यास मुरबाडचे किसन कथोरे , भिवंडी पश्चिमचे महेश चौगुले हे दोघे भाजपचे , कल्याण पश्चिमचे विश्वनाथ भोईर , भिवंडी ग्रामीणचे शांताराम मोरे हे दोघे शिवसेनेचे आणि शहापूरचे दौलत दरोडा हे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे असे एकूण पाच आमदार महायुतीचे आहेत. सकाळी राजीनामा देऊन संध्याकाळी घुमजाव करणारे भिवंडी पूर्वचे आमदार रईस शेख हे समाजवादी पक्षात म्हणजेच महाविकास आघाडीत आहेत. कागदावरील गणितात महायुतीचे कपिल पाटील यांचे पारडे नक्कीच जड वाटत असले तरी निवडणूक रिंगणात परिस्थिती वेगळी आहे असे म्हंटले जात आहे.
कपिल पाटील हे २०१४ मध्ये राष्ट्रवादी मधून भाजपमध्ये आले आहेत. तर सुरेश (बाळ्यामामा) म्हात्रे यांनी काँग्रेस , मनसे ,राष्ट्रवादी ,शिवसेना ,मग आता तिकीट मिळवण्यासाठी परत राष्ट्रवादी असा कायम सत्तेच्या जवळ राहण्याचा प्रदीर्घ प्रवास केला आहे. २०१४ च्या निवडणुकीत एकसंघ शिवसेना आणि भाजप युती असताना भाजपच्या तिकिटावर कपिल पाटील यांनी ४,११,०७० इतकी ४७ टक्के , काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडीच्या विश्वनाथ पाटील यांनी ३,०१,६२० इतकी ३४ टक्के तर तेव्हा उमेदवारी दिली म्हणून मनसे मध्ये असणाऱ्या सुरेश बाळ्यामामा म्हात्रे यांनी ९३,६४७ इतकी मते मिळवली होती. २०१९ मध्येही शिवसेना भाजप एकत्र होतेच आणि नरेंद्र मोदींची प्रचंड लाट असताना कपिल पाटील यांनी ५,२३,५८३ इतकी ५२ टक्के तर आघाडीच्या सुरेश तावरे यांनी ३,६७,२५४ इतकी ३७ टक्के मतं मिळवली होती. या निवडणुकीत वंचितने उभ्या केलेल्या अरुण सावंत यांनी देखील ५१४५५ इतक्या मतांची बेगमी केली होती. यावेळी वंचित ने अपक्ष उमेदवार निलेश सांबरे यांना पाठिंबा दिला आहे.
आता मात्र परिस्थिती वेगळी आहे, महायुती कडून विद्यमान खासदार कपिल पाटील , तर महाविकास आघाडीने बाळ्या मामा म्हात्रे यांना रिंगणात उतरवले आहे. शरद पवार यांनी अत्यंत प्रतिष्ठा लावून ही जागा काँग्रेस कडून खेचून घेतली आहे. तर वंचित च्या पाठिंब्यावर अपक्ष उमेदवार जिजाऊ संघटनेचे निलेश सांबरे मैदानात आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी मध्ये उभी फूट पडली आहे. ग्राम पंचायत , जिल्हा परिषद अशा निवडणुका जरी झाल्या असल्या तरी , महाफुटीनंतर होणारी ही पहिलीच मोठी निवडणूक आहे. भाजपने आमचा बाप पळवला, चिन्ह पळवले , काका पासून पुतण्या पळवला , भावा बहिणीचे नाते मोडले अशा अनेक भावनिक मुद्द्यांच्या लाटेवर महाविकास आघाडी संपूर्ण राज्यातील वातावरण ढवळून काढत आहे. केंद्रीय संस्थाचा वापर करून भाजपमध्ये आलेल्यांना क्लीन चिट दिली जात आहे असे चित्रही महाविकास आघाडी राज्यात उभे करत आहे. तर दुसरीकडे गेल्या दहा वर्षात देशभरात केलेल्या कामांचा पाढा भाजप आणि महायुती वाचत आहेच पण त्याच बरोबरीने लव जिहाद, लॅन्ड जिहाद, ३७० कलम आणि राम मंदिर उभारणी नंतर देशभरात निर्माण झालेल्या हिंदुत्वाच्या लाटेवर भाजप चाणाक्षपणे आरूढ होऊ पहात आहे.
तर त्याच वेळी उद्धव ठाकरे यांनी घेतलेली भाजप विरोधाची आणि प्रामुख्याने नरेंद्र मोदी , अमित शाह , देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधातील आक्रमक भूमिका यामुळे भाजपचे कट्टर विरोधक म्हणून गेल्या साडे चार पाच वर्षात उद्धव ठाकरे हे देशभरात महत्त्वाचे नेते म्हणून पुढे आले आहेत. मुस्लिमांना तर जणू काही ते त्यांचेच नेते आहेत इतके जवळचे वाटायला लागले आहेत. उद्धव यांनी देखील नाईलाजाने म्हणा किंवा राजकीय चातुर्य म्हणा , पण महाविकास आघाडीला खुश ठेवण्यासाठी हल्ली त्यांच्या भाषणात हिंदुहृदयसम्राट , हिंदू बांधवांनो भगिनींनो हे शब्द प्रयोग करणे देखील टाळायला सुरुवात केली आहे. या सर्व गोष्टींचा परिणाम भिवंडी, कल्याण , शहापूर , पडघा , राया , बोरिवली , बदलापूर , मुरबाड असे जिथे जिथे मुस्लिम बहुल पॉकेट्स आहेत तिथे होणार आहे. ही मतं भाजपच्या कपिल पाटील यांना कधीच पडणार नव्हती, पण निलेश सांबरे यातील किती मतं घेऊ शकतात की ती एकगठ्ठा आघाडीच्या सुरेश म्हात्रे यांच्या पदरात पडतात यावर कपिल पाटील यांचे गणित ठरणार आहे. इथून एकही तगडा मुस्लिम उमेदवार निवडणूक रिंगणात नाही हे महत्त्वाचे असून , या मतदारसंघात सव्वा चार लाखाच्या घरात मुस्लिम मतं आहेत, हे इथे लक्षात घेतले पाहिजे.
या मतदारसंघात आगरी मतदार देखील सव्वा तीन ते साडे तीन लाखांच्या घरात आहे. कपिल पाटील आणि बाळ्या मामा म्हात्रे हे दोघेही आगरी समाजातून येतात. त्यामुळे या समाजाची मतं विभागली जाणार आहेत. कल्याण पश्चिम मधील ग्रामीण पट्टा , त्याचप्रमाणे भिवंडी , शहापूर , टिटवाळा , मुरबाड , बदलापूर येथे असलेला आगरी बांधव यांच्यावर शिवसेनेचे ठाणे जिल्ह्यातील स्थानिक ज्येष्ठ नेते , माजी महापौर पुंडलिक म्हात्रे यांचा आजही पगडा आहे. पुंडलिक म्हात्रे हे कपिल पाटील यांच्या अत्यंत जवळच्या नात्यात आहेत. त्याचा फायदा पाटील यांना होणार आहे. पण बाळ्या मामा यातील किती मतं आपल्याकडे खेचू शकतात आणि निलेश सांबरे देखील आगरी समाजाची किती मतं आपल्या पारड्यात पाडू शकतात हे देखील बघणे जरुरीचे आहे.
अर्थात सर्वात महत्त्वाचा ठरणारा , आणि सव्वासात ते साडे सात लाखांच्या घरात असणारा कुणबी समाज हा या मतदारसंघात गेम चेंजर फॅक्टर ठरणार आहे. जिजाऊ संघटनेचे उमेदवार निलेश सांबरे हे कुणबी समाजातून येतात. या संघटनेच्या माध्यमातून सांबरे यांनी गेल्या काही वर्षांत पालघर पासून ते थेट आनगाव ,पारिवली , कवाड भिवंडी , वासींद , शहापूर, मुरबाड , हा संपूर्ण ग्रामीण पट्टा पिंजून काढला आहे. इथला मतदारांशी बोलले असता , ते कपिल पाटील यांच्यावर काहीसे नाराज दिसतात .आम्हाला भाजप हवाय पण हा उमेदवार नको असा त्यांचा सूर ऐकायला येतो. या नाराजीचा सूर कसा मिटवला जातो यावर पाटील यांचे येथील मतदान होणार आहे. शहापूर आणि मुरबाड या विधानसभा मतदारसंघात कुणबी समाज खूप मोठ्या प्रमाणावर आहे. तसाच तो भिवंडी ग्रामीण भागात देखील आहेच. कुणबी समाजाची ही मतं सांबरे स्वतः कडे किती प्रमाणात खेचून घेतात यावर त्यांचे यश तर ठरणार आहेच पण कपिल पाटील आणि बाळ्या मामा म्हात्रे यांचे भवितव्य देखील ठरवणार आहे.
आगरी , कुणबी व मुस्लिम मतांच्या व्यतिरिक्त जी इतर पाच ते सव्वा पाच लाख मतं आहेत त्यातील कल्याण, बदलापूर , शहापूर , मुरबाड , या ठिकाणी पूर्वापार काही पॉकेट्स ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची बांधिलकी जपणारी आहेत. इथून भाजपचा उमेदवार लीड मिळवण्यासाठी मतांची बेगमी करू शकेल. नवी मुंबईतील विमानतळाला लोकनेते दि बा पाटील यांचे नाव , कपिल पाटील या आगरी समाजातील नेत्याला थेट केंद्रात मंत्रिपद या सोशल इंजिनिअरिंगमुळे देखील भाजप आगरी बांधवांची मतं मिळवण्यात कितपत बाजी मारू शकतो हे देखील निकालाचे समीकरण ठरवू शकणार आहे.
थोडक्यात काय तर जात निर्मूलनाचा कितीही आव आणला, जाहीर सभांमध्ये भाषणे ठोकली तरी राजकीय तव्यावर सत्ताकारणाची पोळी भाजून घ्यायची असेल तर जातीचीच समीकरणे जुळवावी लागतात हेच सत्य आहे आणि त्याचीच परिणीती भिवंडी लोकसभा मतदारसंघात बघायला मिळणार आहे.
——————————–