पुणे – ज्यांनी महापुरुषांचा अपमान केला त्या लोकांना जनतेकडे मत मागणयाचा अधिकार नाही अशा शक्तींना या निवडणुकीत पराभूत करायचे आहे. यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने कंबर कसून काम करावे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले. पुणे लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी व इंडिया आघाडीचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार आ. रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ कोथरूड विधानसभा मतदार संघामध्ये पुण्याई सभागृह येथे कार्यकर्त्यांचा भव्य मेळावा आयोजित केला होता त्यावेळी ते बोलत होते.
महागाई, भ्रष्टाचार, बेरोजगारी अशा महत्वाच्या प्रश्नांमुळे जनता त्रस्त झाली आहे. केंद्रातील मोदी सरकार मात्र कुंभकरणाप्रमाणे झोपी गेले आहे या निवडणूकीत मोदी सरकार पराभूत करून लोकशाही व संविधान वाचवण्याची लढाई आपण जिंकली पाहिजे असे म्हणत नाना पटोले यांनी उत्तम काम करीत असल्याबद्दल सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांना शाबासकी दिली.