नवी दिल्ली – काही वर्षांपूर्वी टफ शूजच्या जाहिरातीमुळे वादात आलेला मॉडेल मिलिंद सोमण आता पुमा ब्रँडच्या बुटांच्या जाहिरातीवरून पुन्हा एकदा वादात आला आहे.या जाहिरातीत मिलिंद सोमण रेल्वे रुळांवरून धावताना दिसत आहे. याला भारतीय रेल्वे अकाऊंटस सर्व्हिसच्या (आयआरएएस) एका अधिकाऱ्याने आक्षेप घेतला आहे.
रुपनगुडी असे या आयआरएएस अधिकाऱ्याचे नाव आहे. त्याने एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट शेअर करून पुमाच्या जाहिरातीवर आक्षेप घेतला आहे.रेल्वे रुळ हे जॉगिंग करण्यासाठी नाहीत. असे करणे रेल्वे कायद्यानुसार गुन्हा आहे,असे रुपनगुडी यांचे म्हणणे आहे. रुपनगुडी यांच्या या पोस्टवर सोशल मीडियावर उलटसुलट प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
या जाहिरातीच्या व्हिडिओमध्ये सुरुवातीला घनदाट जंगल आणि त्यातून जाणारी एक पायवाट दिसते. नंतर कॅमेरा त्या वाटेवर जॉगिंग करणाऱ्या मिलिंद सोमणवर स्थिरावतो. सोमण धावताधावता रेल्वे रुळांवर येतो. रेल्वे रुळांवरून तो काही अंतर धावतो आणि बोगद्यातून बाहेर पडल्यावर थांबतो. या त्याच्या रेल्वे रुळांवरून धावण्याला रुपनगुडा यांनी आक्षेप घेतला आहे. त्यांनी रेल्वे मंत्रालयाला टॅग करीत पोस्ट शेअर केली आहे.