नाशिक- नाशिकमध्ये आयसीआयसीआय होम फायनान्स कंपनीच्या जुना गंगापूर नाका शाखेतील तिजोरी उघडून चोरट्यांनी 5 कोटी रुपयांचे ग्राहकांचे गहाण टाकलेले सोन्याचे दागिने लुटले. उच्चभ्रू ग्राहकांनी तारण ठेवलेले सोने अशा सहज पध्दतीने केवळ 15 मिनिटांत बँकेच्या तिजोरीतून लुटल्याने खळबळ माजली आहे. विशेष म्हणजे चोरांनी पीपीई कीट घातले होते. ज्याला या ठेवींची माहिती आहे अशा कुणाच्या मदतीशिवाय हे शक्य नाही. दोन चोरट्यांनी मागील बाजूच्या खिडकीतून बँकेत प्रवेश करून ही चोरी केली. सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या चित्रणातून हे उघड झाले आहे. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून, पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
नाशिक शहरातील उच्चभ्रू वस्ती असलेल्या जुना गंगापूर नाका परिसरात प्रमोद महाजन उद्यानाला लागून असलेल्या इंदिरा हाईटस व्यापारी संकुलात तिसऱ्या मजल्यावर आयसीआयसीआय होम फायनान्सची शाखा आहे. या शाखेतील तिजोरीत 222 खातेदारांचे गहाण ठेवलेले 4 कोटी 92 लाख रुपयांचे सोन्याचे दागिने ठेवले होते. याच दागिन्यांवर चोरांनी डल्ला मारला. चोरीची ही घटना कंपनीच्या कार्यालयातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये कैद झाली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये पीपीई किट घातलेले दोन चोरटे दिसत आहेत. त्यांनी 15 मिनिटात ही चोरी केली. मात्र, त्यांनी तिजोरी न फोडता तिजोरी उघडल्याचे दिसते आहे.
या तिजोरीच्या दोन चाव्या असताना चोरांनी तिजोरी कशी उघडली? याचा अर्थ कुणी आतलेच या चोरीत सामील होते हे उघड आहे. हा परिसर कायम गजबजलेला असतो. या परिसरात सतत लोकांची वर्दळ असते. मात्र, तरीही चोरट्यांनी याठिकाणी दरोडा टाकल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
शनिवारी सकाळी सव्वानऊ वाजताच्या सुमारास शाखा व्यवस्थापक चंद्रकांत मुठेकर यांनी कार्यालय उघडून दैनंदिन कामकाजाला सुरुवात केली. कंपनीच्या सुवर्ण तारण कर्ज योजनेचे अधिकारी किरण जाधव हे संध्याकाळी पावणेसहा वाजताच्या सुमारास एका ग्राहकाचे सोन्याचे दागिने सेफ्टी लॉकरमध्ये ठेवण्यासाठी गेले. त्यांच्याकडील एक चावी आणि कर्ज अधिकारी सिध्दांत इकनकर यांच्याकडील दुसरी अशा दोन चाव्या लावून सेफ्टी लॉकर उघडण्यात आले असता तिजोरी पूर्णपणे रिकामी असल्याचे आढळले.
जाधव यांनी त्वरीत याची माहिती कर्ज व्यवस्थापक रणजित देशमुख यांना दिली. त्यांनी तातडीने प्रशासकीय व्यवस्थापक जयेश कृष्णदास गुजराथी यांना याची माहिती दिली. गुजराथी यांनी तिजोरीची पाहणी केली. त्यानंतर त्यांच्या फिर्यादीवरून सरकारवाडा पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सरकारवाडा पोलिसांसह गुन्हे शाखा परिमंडळ-1 चे पथक या चोरीचा समांतर तपास करीत आहेत.