ठाणे – मुंबईत शिवसेनेची प्रापर्टी जशी मातोश्री आहे तशी ठाण्यात आनंद आश्रम ही आनंद दिघे यांची प्रॉपर्टी आहे. मात्र या ठिकाणी सातबारा आपल्या नावावर करून मुख्यमंत्र्यांनी आनंद दिघे यांची प्रॉपर्टी हडपली आहे असा गंभीर आरोप यावेळी शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी केला आहे. जे आनंद आश्रम दिघेचे आहे,त्यावर स्वतःचे नाव लावण्याचा प्रयत्न करण्यात आला असून असे लोक आनंद दिघे यांचे वारस होऊ शकतात का ? असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला. आनंद दिघे यांची प्रॉपर्टी किती होती असे न विचारता उद्धव ठाकरे यांनी आनंद दिघे यांची प्रॉपर्टी हडप केली का ? असा प्रश्न विचारला असल्याची दाट शक्यता असल्याचे राऊत म्हणाले. राजन विचारे यांच्या प्रचारासाठी ठाण्यातील मनोरमा नगर या ठिकाणी प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते.
त्यावेळी खासदार संजय राऊत, प्रियांका चतुर्वेदी, आनंद दुबे, कॉंग्रेस अध्यक्ष विक्रांत चव्हाण, आशिष गिरी, शिवसेनेच्या ज्योती ठाकरे, जिल्हाप्रमुख केदार दिघे, संपर्क प्रमुख नरेश मणेरा महिला जिल्हा संघटक रेखा खोपकर, समिधा मोहिते, शहर प्रमुख प्रदीप शिंदे, राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष सुहास देसाई, विक्रम खामकर, सुजाता घाग, आपचे धनंजय शिंदे, सतीश सलुजा, संभाजी ब्रिगेड चे चंद्रशेखर पवार, , रिपब्लिक पार्टीचे दयानंद उल्मिक, धर्मराज्य पक्षाचे अध्यक्ष राजन राजे, उपजिल्हाप्रमुख ब्रिजेश तिवारी तसेच महाविकास आघाडीचे इतर प्रमुख नेते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिवसेनेच्या नावावर वाम मार्गाने शिंदे गटाने कोट्यवधी कमवले आणि भाजपच्या वॉशिंग मशीन मध्ये गेले. आनंद दिघे यांच्यावर काढलेला सिमेनाही खोटा असून हा आनंद दिघे यांचा अपमान असल्याचे राऊत म्हणाले. सत्ता आल्यावर राजन विचारे केंद्रात मंत्री झाले पाहिजे असा उल्लेखही राऊत यांनी शेवटी आपल्या भाषणात केला. आपल्या भाषणात संजय राऊत म्हणाले, ४ जून नंतर नरेंद्र मोदी भारतात राहणार नाही, इंग्रजांनी जेवढा देश लुटला नसेल तेवढा यांनी लुटला असून मोदी आणि अमित शहा यांचे पासपोर्ट जप्त करा अशी मागणी राऊत यांनी केली. नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी महाराष्ट्र चालवावा एवढे वाईट दिवस महाराष्ट्रावर आले नाहीत असे राऊत यांनी सांगितले.
आनंद दिघे खरे फकीर..
आनंद दिघे खरे फकीर होते तर मोदी हे नकली फकीर असल्याचा टोला राऊत यांनी लगावला आहे. आनंद दिघे हे मोदींसारखे प्रदर्शन करत नव्हते, कोणत्याही पदाची अपेक्षा त्यांनी ठेवली नाही. शिवसेनेची एक पिढी त्यांनी घडवली असल्याचे राऊत म्हणाले.
जुगारी शेवटचा डाव मंगळसूत्रावर टाकतो
देशातील महिलांचे मंगळसूत्र खेचुन मुसलमानांना देणार या मोदी यांच्या आरोपांवर देखील राऊत यांनी मोदींचा चांगलाच समाचार घेतला. जो स्वतःच्या बायकोचे मंगळसूत्र वाचवू शकला नाही असे सांगत जुगारी शेवटी मंगळसूत्र गहाण टाकतात, आणि आता मोदी तेच करत आहेत असल्याचे राऊत म्हणाले.
शाहू महाराजांच्या पराभवासाठी मुख्यमंत्री १०० कोटी घेऊन कोल्हापुरात तळ ठोकून होते
कोल्हापुरात शाहू महाराजांचा पराभव व्हावा यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्या ठिकाणी १०० कोटी घेऊन तळ ठोकून होते. असा गौप्यस्फोट शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे) नेते संजय राऊत यांनी ठाण्यात झालेला जाहीर सभेत केला. दोन दिवसांपासून मुख्यमंत्री पैसे वाटत असल्याचा आरोप संजय राऊत यांनी यावेळी केला आहे. त्यामुळे यांचे कोल्हापूरच्या गादीवर किती प्रेम आहे हे यावरून लक्षात येत असल्याचे राऊत यांनी सांगितले.