मुंबई : सध्या देशभरात लोकसभा निवडणुकांचा धुरळा पाहायला मिळतोय. काँग्रेस नेते सॅम पित्रोदा यांनी भारतीयांबाबत केलेलं वक्तव्य चर्चेत आहे. पित्रोदा यांच्या वक्तव्यावरुन देशभरात प्रचंड गदारोळ सुरू आहे. पित्रोदा यांच्या वक्तव्यावरुन भाजपनं काँग्रेसला पुरतं फैलावर घेतलं आहे. अशातच पित्रोदा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असल्याची माहिती काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी दिली आहे. अशातच काल (बुधवार) दिवसभरात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या सभांमध्ये सॅम पित्रोदांच्या वक्तव्याचा जोरदार समाचार घेतला. तसेच, सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावरुन मोदींनी महाविकास आघाडीवरही निशाणा साधला आहे. यावेळी मोदींनी उद्धव ठाकरेंचा उल्लेख बाळासाहेब ठाकरेंची नकली संतान असा केला.
पंतप्रधान मोदी सभेत बोलताना म्हणाले की, “काँग्रेसला वाटतं की, पश्चिम भारतातले लोक अरबमधील लोकांसारखे दिसतात. मी जरा बाळासाहेब ठाकरेंचे नकली शिवसेनेचे पुत्र आहेत, त्यांनी जरा बाळासाहेबांना आठवावं. मला बाळासाहेंबांच्या नकली मुलाला विचारायचं, त्यांचे मेंटॉर वयोवृद्ध नेत्यालाही विचारायचंय की, यांनी म्हटलंय पश्चिम भारतातील लोक अरब वाटतात. महाराष्ट्रातील लोकांना ही भाषा मंजूर आहे? काँग्रेसला वाटतं की, उत्तर भारतातले लोक गोऱ्यांप्रमाणे दिसतात. तुम्ही हे वक्तव्य मान्य कराल? सत्तेसाठी देशाची वाटणी करणारी काँग्रेस आता भारतीयांवर वर्णद्वेषी टिप्पणी करण्यावर उतरली आहे.” “काँग्रसेच्या एका मोठ्या नेत्याने पुन्हा एकदा काँग्रेसची विभाजित करण्याच्या विचारांचं प्रदर्शन केलं. गांधी परिवाराच्या अगदी जवळ असणाऱ्या आणि शहजाद्याच्या सगळ्यात मोठ्या सल्लागाराने जे म्हटलं आहे ते शरम आणणारं आहे.”, सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावरुन मोदींनी काँग्रेसवरही जोरदार हल्ला चढवला.