तुम्ही पुण्यातच काम बघा, बारामतीत आम्ही बघू

0

पुणे: चंद्रकांत पाटील यांनी बारामतीमध्ये शरद पवार यांचा पराभव करण्याचे केलेले वक्तव्य हे चूक होते. त्या विधानाला काही अर्थ नव्हता, त्यामध्ये काही तथ्य नव्हते. चंद्रकांत पाटील यांचे ते विधान चूक होते, हे मी कबूल करतो, असे वक्तव्य अजित पवार यांनी केले. ते गुरुवारी शिरुरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी अजित पवार यांनी थेटपणे चंद्रकांत पाटील यांना खडे बोल सुनावले.

शरद पवार साहेब हे बारामतीमध्ये निवडणुकीसाठी उभेच नव्हते तर साहेबांचा पराभव करण्याचा प्रश्नच येत नाही. साहेब निवडणुकीला उभे असते तर वेगळी गोष्ट होती. बारामतीत उभे कोण होते, सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे. पराभव होईल तो या दोघींपैकी एकीचा होईल ना? मग तरीही चंद्रकांत पाटील बारामतीत तसं का बोलून गेले माहिती नाही. नंतर आम्ही चंद्रकांतदादांना म्हणालो, तुम्ही पुण्यात काम बघा, बारामतीत काय असेल ते मी आणि आमचे कार्यकर्ते बघतील. यानंतर चंद्रकांत पाटील यांनी अवाक्षरही काढले नाही, असे अजित पवार यांनी सांगितले.

जी व्यक्ती उभीच नव्हती त्यांचा पराभव करण्याची भाषा योग्य नव्हती. त्यामुळे चंद्रकात पाटील यांचे ते वक्तव्य चूक होते, हे मी मान्य करतो, अशी जाहीर कबुलीच अजित पवार यांनी दिली. मात्र, अजित पवारांनी इतक्या उघडपणे चंद्रकांत पाटील यांना खडे बोल सुनावल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. बारामती लोकसभेच्या प्रचारावेळी अजित पवार यांनी शरद पवार यांच्यावर अनेकदा थेटपणे टीका केली होती. मात्र, चंद्रकांत पाटील यांचे, शरद पवार यांना बारामतीमधून संपवण्याचे वक्तव्य योग्य नसल्याचे अजितदादांनी सडेतोडपणे सांगितले आहे. यावर आता चंद्रकांत पाटील आणि भाजपचे इतर नेते काय बोलणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech