नवी दिल्ली- 1950 ते 2015 या 65 वर्षांच्या काळात भारतातील हिंदूंची लोकसंख्या 7.8 टक्क्यांनी घटली आहे. तर मुस्लीम लोकसंख्या 43.15 टक्क्यांनी वाढली आहे, अशी माहिती पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेच्या अहवालातून उघड झाली आहे. ऐन निवडणुकीच्या काळात आलेल्या या अहवालावरून राजकारण सुरू झाले असून, भाजपा या अहवालाचा निवडणूक प्रचारात वापर करणार हे उघड आहे. त्यामुळे तो आताच कसा प्रसिद्ध करण्यात आला, असा प्रश्न विरोधकांनी विचारला आहे.
अर्थतज्ज्ञ शमिका रवी, अब्राहम जोस आणि अपूर्व कुमार मिश्रा यांनी हा अहवाल तयार केला आहे. हा अहवाल प्रसिद्ध झाल्यावर भाजपाच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी ही आकडेवारी देत सोशल मीडियावरून काँग्रेसवर निशाणा साधला आहे. आपल्या पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे की, काँग्रेसच्या अनेक दशकांच्या राजवटीने हे केले आहे. त्यांना सोडले तर हिंदूंसाठी एकही देश उरणार नाही. केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनीही काँग्रेसवर टीका केली आहे. ते म्हणाले की, देशाची दिशाभूल करण्याचा काही लोकांचा प्रयत्न होता. परंतु सत्य लपून राहत नाही. 1947 मध्ये हिंदूंची लोकसंख्या जवळजवळ 90 टक्के होती. ती आज सत्तर टक्क्यांपर्यंत खाली आली आहे, तर पूर्वी 8 टक्के असलेले मुस्लीम 20 टक्क्यांवर गेले आहेत. काँग्रेसने देशाला धर्मशाळा बनवले. देशात बांगलादेशी, रोहिंग्या घुसखोर आले आहेत. आता ते मुस्लिमांना आरक्षण देण्याची तयारी करत आहेत. भारताला इस्लामिक स्टेट बनवण्याची तयारी करत आहेत.
विरोधकांनी या अहवालावर टीका केली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यावर प्रतिक्रिया देताना म्हणाले की, यामुळे अजिबात न भरकटता तुम्ही नोकऱ्यांवर लक्ष द्या, तर प्रियंका गांधी म्हणाल्या, जनतेच्या जीवनाशी निगडित असलेल्या मुद्यांवर आपण बोलले पाहिजे. भाजपा वेगळेच मुद्दे निर्माण करत आहे. एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी हा व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटीचा अहवाल असल्याचे म्हटले आहे.
या अहवालानुसार, ख्रिश्चनांच्या लोकसंख्येत 5.83 टक्क्यांनी वाढ झाली आहे. 1950मध्ये ख्रिश्चन लोकसंख्या 2.24 टक्के होती. ती 2.36 टक्के झाली. तर शीख लोकसंख्या 6.28 टक्क्यांनी वाढली. जैनांची लोकसंख्या कमी झाली असून 1950 मध्ये ती 0.45 टक्के होती. 2015 मध्ये ती 0.36 टक्के झाली. पारशी लोकसंख्येतही घट झाली आहे, तर बौद्ध लोकसंख्येत किंचित वाढ झाली आहे.
या अहवालात भारताच्या शेजारच्या देशातील लोकसंख्येचेही विश्लेषण करण्यात आले आहे. त्यानुसार बांगलादेश, पाकिस्तान, श्रीलंका, भूतान आणि अफगाणिस्तान या दक्षिण आशियाई देशांमध्ये बहुसंख्यांची लोकसंख्या वाढली, तर अल्पसंख्याक लोकसंख्या घटली. बांगलादेशातील बहुसंख्य धार्मिक लोकसंख्या 18 टक्क्यांनी वाढली. पाकिस्तानातील मुस्लीम लोकसंख्या 10 टक्क्यांनी वाढली आहे.