नवी दिल्ली – कथित दिल्ली दारू घोटाळ्याप्रकरणी दिल्लीच्या तिहार तुरुंगात असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सरकारी कामकाज चालविण्यासाठी तुरुंगात कार्यालयासाठी जागा आणि आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी करणारी एक याचिका दिल्ली उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती.न्यायालयाने ही याचिका तर फेटाळून लावली, त्याचबरोबर याचिकाकर्त्याला एक लाख रुपयांचा दंडही ठोठावला. आम आदमी पार्टीचे (आप) समर्थक अॅड श्रीकांत प्रसाद यांनी ही याचिका दाखल केली होती. केजरीवाल यांना तुरुंगात कार्यालयासाठी जागा देण्याबरोबरच त्यांच्या विरोधातील बातम्या थांबविण्याचे आदेश द्यावेत,अशी मागणीही त्यांनी याचिकेद्वारे केली होती.
दिल्ली उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायाधीश मनमोहन यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर याचिकेवर सुनावणी झाली. त्याप्रसंगी न्यायालयाने प्रसाद यांच्या याचिकेमध्ये काहीही विचारात घेण्याजोगे नाही,असे निरीक्षण नोंदवित याचिका फेटाळली.तसेच विनाकारण न्यायालयाचा वेळ वाया घालविल्याबद्दल त्यांना एक लाख रुपयांचा दंड ठोठावला.