तिरुअनंतपुरम – केरळमधील अनेक मंदिरात कन्हेर फुलांवर बंदी घालण्यात आली आहे. केरळमधील मंदिरांचे व्यवस्थापन करणारे त्रावणकोर देवस्वोम बोर्ड आणि मलबार देवस्वोम बोर्ड यांनी हा निर्णय घेतला आहे. कन्हेर फुलांमध्ये विषारी पदार्थ आढळतात. त्यामुळे मानव आणि प्राण्यांना इजा होऊ शकते. केरळमधील अनेक मंदिरांमध्ये कन्हेरचे फूल देवाला नैवेद्य म्हणून अर्पण केले जाते. मात्र, केरळच्या अलप्पुळा येथील एका महिलेचा कन्हेरची फुले आणि पाने खाल्ल्याने मृत्यू झाला होता. दोन दिवसांपूर्वी पतनमतिट्टा येथे कन्हेरची पाने खाल्ल्याने गाय आणि वासराचा मृत्यू झाला. या घटनांचा गांभीर्याने विचार करत त्रावणकोर देवस्वोम बोर्ड आणि मलबार देवस्वोम बोर्ड यांनी केरळमधील मंदिरात कन्हेर फुलांचा वापर करण्यावर बंदी घातली आहे. कन्हेरऐवजी तुळशी, चमेली आणि गुलाब यांसारखी फुले वापरण्याचा सल्ला देण्यात आला आहे.