मुंबई : आपल्याला भारताबाहेरून राहील नावाच्या व्यक्तीने जीवे मारण्याची धमकी दिल्याचं सांगत अॅड. गुणरत्न सदावर्तेंनी भोईवाडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. शरद पवार आणि दाऊद इब्राहिम कासकर यांच्याबद्दल माध्यमासमोर वक्तव्य केल्यानंतर हा धमकीचा फोन आल्याचा दावा सदावर्तेंनी केला.
राहील नामक व्यक्तीने भारताच्या बाहेरून धमकीचा फोन केल्याची माहिती अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी दिली. या संदर्भात गृहविभागाने देखील दखल घेऊन दहशतवाद विरोधी पथकाकडे याचा तपास द्यावा अशी मागणी सदावर्तेंनी केला.
अॅड. गुणरत्न सदावर्ते आणि त्यांच्या पत्नी जयश्री पाटील यांना सहकार खात्यानं मोठा दणका दिला असून एसटी को-ऑपरेटिव्ह बँकेच्या संचालकपदावरून दोघांचीही गच्छंती करण्यात आली आहे. 4 ऑक्टोबर 2023 रोजी कामगार संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष संदीप शिंदे यांनी सहकार आयुक्त यांच्याकडे केलेल्या तक्रारीनुसार, यवतमाळमध्ये सदावर्ते पॅनलच्या संचालकांनी वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित केली होती. या सभेपूर्वी सर्व सभासदांना अहवालाचे वाटप करण्यात आलं नव्हतं. एवढंच नाही तर त्यावर नथुराम गोडसेचे फोटो छापण्यात आले होते. एसटी कामगारांचा राजकारणाशी काहीही संबंध नसताना गोडसेचे फोटो छापणं योग्य नाही अशी तक्रार एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी सहकार आयुक्तांकडे केली होती.
वार्षिक सर्वसाधारण सभा घेणे पूर्वी सर्व सभासदांना 14 दिवस आधी वार्षिक सर्वसाधारण सभेची सुचना देणे आवश्यक होते. परंतु अशा कुठल्याही सूचना या संचालक मंडळाकडून देण्यात आल्या नव्हत्या. आपल्या मर्जीतील सभासद बोलवून, हवे त्या विषयांना मंजुरी मिळवून घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात आला. मुख्य म्हणजे पोटनियम बदलाची सुचना सभासदांना देणे बंधनकारक होते.
या ठिकाणी बँकेचे तज्ञ संचालक म्हणून सदावर्ते पती-पत्नींची निवड बेकायदेशीर रित्या करण्याचा ठराव आणला. तो ठरावही सहकार खात्याने रद्द केल्यामुळे आता यापुढे सदावर्ते पती-पत्नी स्वीकृत संचालक म्हणून राहणार नाहीत. बँकेचे अध्यक्ष उपाध्यक्ष हे निर्वाचित संचालकांमधून असावेत असेही प्रकारचा ठराव त्यांनी बेकायदेशीररित्या केला होता. या ठरावाला सहकार खात्याने नामंजूर केले आहे. दरम्यान, अशी कोणतीही कारवाई आपल्यावर करण्यात आली नसल्याचा दावा गुणरत्न सदावर्तेंनी केला आहे.