पुणे : काँग्रेस इंडिया आघाडीकडे मुद्दे नसल्याने राज्य घटना बदलण्याचा संभ्रम निर्माण करत आहे. राज्यघटनेतील मूलभूत तत्त्व बदलता येत नाहीत. इंदिरा गांधी यांनीच घटनेची मोडतोड केली. ८० वेळा काँग्रेसनेच घटना दुरुस्ती केली. जे कामाने निवडून येत नाही, ते जातीची ढाल पुढे करतात, असे मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मांडले.महाराष्ट्राला गेल्या पाच वर्षांत ५ लाख कोटी रुपये दिले. पुण्यामध्ये वाहतूक कोंडी, प्रदूषण असे प्रश्न आहेत. स्वारगेटसारखी गर्दी विमानतळावर होते. त्यामुळे नवी मुंबईच्या धर्तीवर पुण्याला आता नवीन पुण्याची गरज आहे, असेही त्यांनी सांगितले.
पुणे लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ नातूबाग मैदान येथे झालेल्या प्रचार सभेत गडकरी बोलत होते. चंद्रशेखर बावनकुळे, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दीपक मानकर, रुपाली पाटील ठोंबरे, किरण साळी, हेमंत रासने, स्वरदा बापट, श्रीनाथ भिमाले, शैलेश टिळक, अॅड. मंदार खरे या वेळी उपस्थित होते.पुणे वर्तुळाकार मार्गाचे काम आता होत आहे. माझी एक चूक झाली, ती म्हणजे मुंबई पुणे एक्प्रेस हायवेचे काम करताना २५ वर्षांचा विचार करून काम करायला हवे होते. पण आता वर्तुळाकार मार्गामुळे वाहतुकीची समस्या सुटणार आहे. महामार्गावरील वाहतूक शहरात येणार नाही, असेही नितीन गडकरी यांनी सांगितले.