नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी पद्मश्री पुरस्कार प्राप्त आदिवासी कवयित्री पूर्णमासी जानी यांची भेट घेतली. या वेळी मोदींनी त्यांचा सन्मान केला आणि चरण स्पर्श करुन आशीर्वाद घेतले. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी देशभर दौरा करत आहेत. आज त्यांनी ओडिशाच्या कंधमाल येथे सभा घेतली. पूर्णमासी जानी यांचा जन्म १९४४ साली झाला आहे. त्या ८० वर्षांच्या आहेत.
पूर्णमासी या तडीसरु बाई नावाने देखील ओळखल्या जातात. त्या कवयित्री आणि सामाजिक कार्यकर्त्या आहेत. ओडिया, कुई आणि संस्कृत भाषेमध्ये त्यांनी ५० हजारांहून अधिक भक्तिगीते लिहिली आहेत. २०२१ मध्ये त्यांच पद्मश्री देऊन सन्मान करण्यात आला होता. पद्मश्री हा देशातील सर्वोच्च सन्मानांपैकी एक आहे. पंतप्रधान मोदी यांनी ओडिसा येथे गेल्यानंतर कवयित्रीचे चरण स्पर्श केले. यासंदर्भातील व्हीडओ पीटीआयने शेअर केला आहे. देशात १९५४ पासून पद्म पुरस्कार दिले जातात. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला या पुरस्कारांची घोषणा केली जाते. सरकारकडून विविध क्षेत्रामध्ये असामान्य काम करणा-या लोकांची नावे मागवली जातात. त्यानंतर काहींची पद्म पुरस्कारासाठी निवड केली जाते.
पंतप्रधान मोदी यांनी कंधमाल येथील सभेत विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. ओडिसाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी राज्यातील सर्व जिल्ह्यांची नावे सांगावेत असे आव्हान पंतप्रधान मोदी यांनी केले. मोदी म्हणाले की, ‘निवडणुकीमध्ये भाजप विक्रम करणार आणि ४०० चा आकडा पार करणार. राहुल गांधी यांच्यावर टीका करताना मोदी म्हणाले की राहुल गांधी २०२४ च्या निवडणुकीत तेच भाषण देत आहेत जे त्यांनी २०१४ आणि २०१९ मध्ये दिले होते. काँग्रेसला लोकसभा निवडणुकीमध्ये १० टक्के जागा देखील मिळणार नाहीत. ५० जागा देखील काँग्रेस जिंकू शकणार नाही. त्यामुळे काँग्रेसला विरोधी पक्षाचा दर्जा देखील मिळणार नाही.