नवी दिल्ली – दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे मद्य घोटाळ्याच्या आरोपाखाली 39 दिवस कैदेत राहून जामिनावर सुटून बाहेर आले आणि आज पत्रकार परिषद घेऊन त्यांनी पंतप्रधान नरेेंद्र मोदी यांच्यावर घणाघाती हल्लाबोल केला. अरविंद केजरीवाल म्हणाले की, ‘मोदी की गॅरंटी’ देणे सुरू आहे. मात्र मोदींनीच केलेल्या नियमानुसार 75 वर्षे पूर्ण झाल्यावर भाजपाच्या नेत्यांना पदावर राहता येणार नाही. सप्टेंबर 2025 मध्ये मोदी 75 वर्षांचे होत आहेत. त्यानंतर ते अमित शहा यांना पंतप्रधान करणार आहेत. अमित शहांच्या शब्दाबद्दल गॅरंटी घेता येणार आहे का? यानंतर टीका प्रखर करीत केजरीवाल म्हणाले की, मोदींना ‘एक देश एक नेता’ हा अजेंडा राबवायचा आहे. त्यांनी एकएक करीत विरोधी पक्षांना संपविण्याचे काम सुरू केलेलेच आहे पण स्वत:च्या पक्षात त्यांना जो तुल्यबळ वाटतो त्यांनाही एक एक करून मोदी संपवित आहेत. त्यांच्या कुटील कारस्थानापासून जनतेने सावध राहावे.