‘त्यांनी बांगड्या घातल्या नसतील तर आम्ही त्या घालायला भाग पाडू’

0

मुझफ्फरपूर – ‘इंडिया’च्या नेत्यांना पाकिस्तानच्या अण्वस्त्रक्षमतेचे भय वाटते, अशी घणाणाती टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी केली. पंतप्रधानांनी सोमवारी बिहारमधील हाजिपूर, मुझफ्फरपूर आणि सरन लोकसभा मतदारसंघांत एकापाठोपाठ एक प्रचारसभा घेतल्या. ‘इंडियाचे नेते पाकिस्तानला घाबरतात आणि त्यांना त्यांच्या अण्वस्त्रक्षमतेची भयावह स्वप्ने पडतात,’ अशी टीका त्यांनी केली. नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारूख अब्दुल्ला यांनी पाकिस्तानकडे अणुबॉम्ब असून त्यांनी बांगड्या घातलेल्या नाहीत, असे वक्तव्य केले होते. या वक्तव्याचा मोदी यांनी त्यांचे नाव न घेता समाचार घेतला. ‘पाकिस्तानने बांगड्या घातल्या नसतील तर आम्ही त्यांना त्या घालायला भाग पाडू. त्यांच्याकडे अन्नधान्य नव्हते, हे मला माहीत होते. आता मला कळलेय की त्यांच्याकडे बांगड्यांचा पुरेसा साठादेखील नाही,’अशी टीका पंतप्रधानांनी केली.

‘दहशतवादाबाबत पाकिस्तानला क्लीन चिट देणाऱ्या आणि सर्जिकल स्ट्राइकवर शंका उपस्थित करणाऱ्या भ्याड लोकांचा भरणा विरोधी पक्षांत आहे. त्यांचा सहकारी असणाऱ्या डाव्या पक्षांना आपल्याकडची अण्वस्त्रशक्ती नष्ट करायची आहे. अशा विरोधकांवर नीट लक्ष ठेवले पाहिजे,’ असे मोदी यांनी नमूद केले.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech