नवी दिल्ली – आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांना मुख्यमंत्री पदावरून हटवण्यासंबंधीच्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. केजरीवाल यांना दिल्ली मद्य धोरण प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) अटक केली आहे. त्यामुळे त्यांना दिल्लीच्या मुख्यमंत्री पदावरुन हटवावे, अशी मागणी या याचिकेतून करण्यात आली होती. ही याचिका न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती दीपंकर दत्ता यांच्या खंडपीठाने फेटाळली.
आजच्या सुनावणीत न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि दीपंकर दत्ता यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले की, केजरीवाल यांना दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदावरून हटवण्याची याचिका फेटाळून लावणाऱ्या दिल्ली उच्च न्यायालयाच्या निकालात न्यायालय हस्तक्षेप करण्यास इच्छुक नाही. सर्वोच्च न्यायालयात धाव घेणारे याचिकाकर्ते कांत भाटी हे उच्च न्यायालयासमोरील याचिकाकर्ते नसल्याचेही खंडपीठाने निदर्शनास आणून दिले. दरम्यान, यापूर्वीही केजरीवाल यांना दिल्लीच्या मुख्यमंत्री पदावरून हटवण्याची मागणी करणाऱ्या याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळल्या होत्या. या प्रकरणातील याचिकाकर्ता न्यायालयाला राजकारणात ओढण्याचा प्रयत्न करत आहे, असे फटकारत याचिकाकर्ते आपचे माजी आमदार संदीप कुमार यांना ५० हजारांचा दंडही ठोठावला होता.