नवी दिल्ली – दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी, त्यांचे खासगी सचिव (ओएसडी) विभव कुमार यांनी आपल्याला मारहाण केल्याचा आरोप आम आदमी पक्षाच्या राज्यसभा खासदार स्वाती मालिवाल यांनी सोमवारी केल्याने खळबळ उडाली. त्यांनी या प्रकरणी लेखी तक्रार केली नाही. या घटनेनंतर स्वत: मालिवाल यांनी किंवा मुख्यमंत्री कार्यालयानेही उशिरापर्यंत कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही; मात्र भाजपने यावरून केजरीवाल यांना लक्ष्य केले.
‘आप’च्या खासदार स्वाती मालिवाल यांनी सोमवारी सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास पोलिसांना दूरध्वनी करून, केजरीवाल यांच्या निवासस्थानी विभव कुमार यांनी आपल्याला मारहाण केल्याची तक्रार केली. त्यानंतर मालीवाल यांनी स्वतः सिव्हिल लाइन पोलिस ठाण्यात येऊन केजरीवाल यांच्या निवासस्थानी आपल्यावर हल्ला झाल्याचा आरोप केला, असा दावा भाजपच्या माहिती-तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख अमित मालवीय यांनी सर्वप्रथम केला.
लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असताना, मुख्यमंत्री केजरीवाल यांच्यावरील हे आरोप गंभीर मानले जात आहेत. विभव कुमार हे केजरीवाल यांचे निकटवर्ती आहेत. केजरीवाल अटकेत असताना, तुरुंग प्रशासनाला दिलेल्या भेटींगाठींच्या व्यक्तींच्या यादीत संदीप पाठक आणि त्यांचे कुटुंबीय याशिवाय केवळ विभव कुमार यांचे नाव दिले होते. आणखी चार नावे देण्याचा पर्याय असतानाही, त्यांनी त्यांच्या मंत्रिमंडळातील एकाही सहकाऱ्याचे नाव सुचविले नाही. विभव कुमार यांच्याविरुद्ध ईडी चौकशी सुरू आहे.