मुंबई – हवामान खात्याने सांगितले की, नैऋत्य मान्सून त्याच्या नियोजित वेळेपेक्षा तीन दिवस आधीच पुढे सरकत आहे. हवामान खात्यानुसार, नैऋत्य मान्सून १९ मे च्या सुमारास दक्षिण अंदमानच्या समुद्रात दाखल होणार आहे. याशिवाय तो त्याच दिवशी दक्षिण-पूर्व बंगालच्या उपसागराच्या काही भागातही प्रवेश करणार आहे. दरवर्षी २२ मे रोजी मान्सून या भागात पोहोचतो, मात्र यंदा तो तीन दिवस आधी दाखल होणार आहे. आज मुंबईसह उपनगरामध्ये झालेल्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. येत्या २४ तासांत मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
केरळमध्ये साधारणपणे १ जूनच्या आसपास मान्सून दाखल होत असतो. त्यानंतर तो उत्तरेकडे सरकतो. १५ जुलैदरम्यान तो संपूर्ण देशात पोहोचतो. यंदा देशात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडेल, असा अंदाज आधीच हवामान खात्याने व्यक्त केला आहे. भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार जून ते सप्टेंबर दरम्यान देशभरात मान्सूनचा पाऊस अधिक ५% च्या फरकाने सुमारे १०६% अपेक्षित आहे, जो सामान्यपेक्षा जास्त मानला जातो.
सन १९७१-२०२० पर्यंतच्या दीर्घकालीन आकडेवारीच्या आधारे संपूर्ण हंगामातील दीर्घकालीन सरासरी पर्जन्यमान ८७ सेमी असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. गेल्या वर्षी मान्सूनचा दीर्घ कालावधीचा सरासरी पाऊस ९४.४% म्हणजेच सामान्यतेपेक्षा कमी होता. त्यापूर्वी २०२२ चा मान्सून एलपीएच्या १०६% वर सामान्यपेक्षा जास्त होता; २०२१ मध्ये दीर्घ कालावधीतील मान्सूनचा सरासरी पाऊस ९९% वर सामान्य आणि २०२० मध्ये पुन्हा सामान्यपेक्षा १०९% नोंदवला गेला. हवामान खात्याने म्हटले आहे की मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात एक अद्यतनित अंदाज पुन्हा जारी केला जाईल, ज्यामध्ये उत्तर-पश्चिम भारत, मध्य भारत, दक्षिण द्वीपकल्प आणि ईशान्य भारतातील मान्सूनची स्थिती आणि अंदाज याविषयी माहिती अद्यतनित केली जाईल.
दक्षिण कर्नाटकच्या अंतर्गत भागांवर चक्रीवादळाचे परिवलन आहे. त्यामुळे पुढील ५ दिवसांत मध्य प्रदेश, विदर्भ, छत्तीसगड, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात गडगडाटी वादळ, विजांचा कडकडाट आणि जोरदार वा-यासह(४०-६० किमी प्रतितास) मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.