मुंबई – राज्यात चारही टप्प्यात झालेले मतदान महायुतीला अनुकूल असून चौथ्या टप्प्यापर्यंत चांगले यश महायुतीला मिळेल असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला. मुंबई प्रदेश कार्यालयात माध्यमांशी बोलताना महायुतीच्या विजयाचीही खात्री दिली.
यावेळी तटकरे म्हणाले की, विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जागा आहेत तर शेवटच्या टप्प्यात मुंबईसह ठाणे लोकसभा मतदारसंघात निवडणूक आहे त्यामुळे आणखी वेग येईल. महायुतीची लाट आहे असे ते म्हणणार नाहीत आणि ते स्वाभाविकच आहे. त्यांना कार्यकर्त्यांचे मनोबल टिकवायचे असल्यामुळे आणि पाचव्या टप्प्यात महाविकास आघाडीचे उमेदवार लढत असल्यामुळे मतदारांच्या मनात किंवा कार्यकर्त्यांच्या मनात विश्वास टिकून रहावा या हेतूने त्यांनी ते वक्तव्य केले असावे यापेक्षा ग्राऊंड रिऍलिटी फार वेगळी आहे असा टोलाही सुनील तटकरे यांनी लगावला.
खडकवासला विधानसभा मतदारसंघात सुनेत्रावहिनी पवार यांना फार मोठी आघाडी म्हणजे २०१९ मध्ये भाजपला मिळाली होती त्यापेक्षा जास्त आघाडी मिळेल असा विश्वासही सुनिल तटकरे यांनी व्यक्त केला.आम्ही सर्व जागा महायुतीमध्ये लढत आहोत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर आम्ही जरी जागा लढल्या असल्या तरी महायुती म्हणून राज्यात सर्वाधिक जागा जिंकणार आहोत असेही तटकरे यांनी सांगितले. बारामतीमध्ये निकाल काय लागणार आहे याची रोहित पवार यांनी पराजयाची प्रत्यक्ष – अप्रत्यक्ष ट्वीट करत कबुली दिली आहे असा थेट हल्लाबोल तटकरे यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुंबईत सभा होत असून या सभेचे नियोजन तिन्ही पक्षांचे नेते करत आहेत. मी स्वतः परवाच्या (बुधवारी) दिवशी कल्याण येथील सभेला राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष म्हणून उपस्थित राहणार आहे. मोदींची मुंबईतील सभा यशस्वी करणे हे महायुतीच्या प्रत्येक कार्यकर्त्याचे व घटक पक्षाचे कर्तव्य आहे असेही तटकरे यांनी सांगितले.