पाटणा – पंतप्रधान नरेंद्र मोदी आज १३ मे रोजी बिहारच्या दौऱ्यावर असून, त्यांनी पाटणा येथील गुरुद्वारा हरमंदिर साहिबला भेट देत सेवा केली. लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील प्रचार संपला असून तर आज (१३ मे) रोजी मतदान होत आहे. अशातच पाचव्या टप्प्यातील प्रचारासाठी भाजपकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभांचे आयोजन केले आहे.
नरेंद्र मोदी यांनी पाटण्यातील गुरुद्वारा हरमंदिर साहिबला भेट दिली. या भेटीमध्ये ते शिखांचे दहावे गुरु गोविंदसिंग यांच्या पवित्र स्थळी नतमस्तक झाले. दर्शन घेतल्यानंतर मोदी यांनी स्वयंपाकगृहात जाऊन पोळ्या लाटल्या व दर्शनासाठी आलेल्या भाविकांना जेवण वाढत लंगर सेवा दिली. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी भगव्या रंगाचा फेटा परिधान केला होता. गुरुघरात त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.
गुरुद्वारा हरमंदिर साहिबला भेट देणारे नरेंद्र मोदी हे पहिलेच पंतप्रधान ठरले आहेत. त्यांनी गुरुद्वारामध्ये असणारे शस्त्रे पाहिली, लोकांना भेटले आणि सर्वांच्या शुभेच्छा स्वीकारल्या. यावेळी त्यांच्यासोबत पाटणा साहिब लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार माजी केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसादही उपस्थित होते.