एकनाथ शिंदे डोंबिवलीत श्रीकांत शिंदेंच्या प्रचार रॅलीत

0

डोंबिवली – शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे डोंबिवलीत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रचाररॅलीत सहभागी होणार आहेत. गुरुवारी १६ मे रोजी डोंबिवली शहर आणि कल्याण ग्रामीण भागात ही रॅली निघणार असून यावेळी राज्यातील मंत्री, आमदार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती शिवसेनेचे कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी दिली आहे.

लोकसभा निवडणुकांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सारा महाराष्ट्र पिंजून काढला आहे. तर दुसरीकडे त्यांचे सुपुत्र डॉ. श्रीकांत शिंदे निवडणूक लढवत असलेल्या कल्याण लोकसभा मतदारसंघात मात्र मुख्यमंत्री शिंदे यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांवर प्रचाराची धुरा सोपवली आहे. डॉ. श्रीकांत शिंदे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे डोंबिवलीत आले होते. यानंतर आता येत्या गुरुवारी, १६ मे रोजी डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री शिंदे डोंबिवलीत येत आहेत. डोंबिवलीच्या नांदीवली येथील स्वामी समर्थ चौकातून सायंकाळी ५ वाजता मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत या प्रचार रॅलीला सुरुवात होईल. यानंतर डोंबिवली शहर आणि कल्याण ग्रामीण असा ४ किमीचे मार्गक्रमण करून आजदे गावात रॅलीचा समारोप होईल, अशी माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी दिली आहे.

या रॅलीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह राज्यातील अनेक मंत्री, आमदार, नेते आणि मान्यवर मंडळी सहभागी होणार आहेत. तर महायुतीचे कार्यकर्तेही हजारोंच्या संख्येने रॅलीत सहभागी होणार असल्याची महिती शिवसेना कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी दिली आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech