नवी दिल्ली – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नुकतेच टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत मोठे वक्तव्य केले आहे. दक्षिण भारतात यावेळी भाजपा हा सर्वात मोठा पक्ष असेल, असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला. संपूर्ण दक्षिणेत जागांचा आम्ही मोठा लाभ मिळवू, असा दावा त्यांनी मुलाखतीत केला आहे. त्यामुळे दक्षिण भारतात काँग्रेसचे वर्चस्व असताना भाजपा या ठिकाणी कशा प्रकारे मुसंडी मारेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
या मुलाखतीत केंद्रीय मंत्री अमित शहा यांना दक्षिण भारतात यावेळी भाजपा अधिक जागा जिंकेल, असे म्हटले आहे. तुम्ही दक्षिण भारतात प्रचंड लक्ष ठेवून आहात का? असा प्रश्न अमित शहा यांना विचारला असता ते म्हणाले की, कर्नाटक, तेलंगण, आंध्र प्रदेश, केरळ आणि तमिळनाडूतून आम्ही सर्वाधिक जागा जिंकू याचा पुनरुच्चार करतो. भाषा, विचारांच्या पुढे जाऊन लोकांनी पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाला पाठिंबा दिला आहे. म्हणूनच दक्षिण भारतात पक्षाचा विस्तार झाला आहे.
तसेच, भाजपाला दक्षिण भारत समजला नाही, असे जे म्हणतात, त्यांना भाजपा समजला नाही. आम्ही भारतासाठी जगतो आणि भारताविषयी बोलतो, तेव्हा त्यात दक्षिण भारताचा समावेश नसतो का? आम्ही भारतीय संस्कृतीबद्दल बोलतो, तेव्हा आम्ही दक्षिणेतील संस्कृती आणि परंपरेबद्दलही आदर व्यक्त करीत असतो, असे यावेळी अमित शहांकडून स्पष्टपणे सांगण्यात आले आहे.
तर, पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीत पराभवाच्या पार्श्वभूमीवर तुमचे त्या राज्यातील लक्ष्य कितपत सत्यात उतरेल? असा प्रश्न अमित शहांना विचारला असचा ते म्हणाले की, विधानसभेत आम्हाला धक्का बसला असे मला वाटत नाही. आम्ही सरकार बनवू असा विश्वास होता; पण काँग्रेस आणि मार्क्सवादी पक्ष शून्यावर जात असताना आणि आमच्या मतांचा हिस्सा फक्त पाच टक्के असताना आम्ही तीन जागांवरून 77 जागांवर पोचलो आहोत, हे काही कमी साध्य नाही. त्याशिवाय, लोकसभेच्या निवडणुकीत गेल्या वेळी आम्ही 18 जागा जिंकल्या होत्या. या वेळी आम्ही त्यात आणखी सुधारणा करू. माफ करा; पण आम्हाला पत्रकारांप्रमाणे सर्व्हेवर अवलंबून राहावे लागत नाही. आम्ही लोकांच्या प्रतिसादावर पाहतो आणि या वेळी पश्चिम बंगालमध्ये 42 पैकी 30 जागा जिंकण्याचा मला विश्वास आहे आणि हे लक्षात ठेवा, असेही त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे.