वाराणसी – पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भव्य शक्तिप्रदर्शन करत वाराणसी मतदारसंघात आपला लोकसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांचा उमेदवारी अर्ज भरताना भाजपाचे मोठे नेते, देशातील अनेक मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री उपस्थित होते. गंगा पूजन, काळभैरव दर्शन आणि रोड शो करत मोदींनी उमेदवारी अर्ज भरला. अर्ज दाखल केल्यावर मोदींनी सोशल मीडियावर भावूक पोस्ट करत म्हटले की, आईच्या मृत्यूनंतर आई गंगाच माझी आई आहे. गंगेनेच आता मला दत्तक घेतले आहे.
नरेंद्र मोदी यांनी वाराणसीतून तिसर्यांदा उमेदवारी अर्ज भरला. त्यासाठी भव्य सोहळ्यासारख्या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी सकाळी साडेनऊ वाजता मोदींनी दशाश्वमेध घाटावर जाऊन 20 मिनिटे गंगापूजन केले. त्यानंतर कालभैरव मंदिरात जाऊन पूजा केली. तिथून ते उघड्या गाडीत वाराणसी येथील जिल्हा दंडाधिकारी कार्यालयात गेले. यावेळी मोदींच्या मिरवणुकीत भाजपा कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. त्यांनी गळ्यात भाजपाचे भगवे उपरणे, डोक्यावर भगवे फेटे बांधले होते, तर हातात भाजपाचे कमळ हे चिन्ह घेतले होते. मोदींना पाहायला रस्त्याच्या दोन्ही बाजूंना मोठी गर्दी उसळली होती. त्यानंतर मोदींनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांच्या अर्जावर अनुमोदक म्हणून पंडित गणेश्वर शास्त्री, बैजनाथ पटेल, लालचंद कुशवाह आणि संजय सोनकर यांची अनुमोदक म्हणून नावे होती. यावेळी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शहा उपस्थित होते.