ठाणे – नरेंद्र मोदींचा आतापर्यंतचा राजकीय प्रवास म्हणजे हरिवशंराय बच्चन यांच्या अग्निपथ कवितेप्रमाणे असून ते जे बोलतात ते करतात अशी स्तुतीसुमनं राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उधळली. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या करिश्मा असा आहे की आपण आता कल्याण, ठाणे आणि भिवंडी या तीनही जागा जिंकतोय असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, वाराणसीमधील जनता ही मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी किती आतुर झाली आहे हे पाहिलं आहे. त्याचा आम्हाला अभिमान वाटला. वाराणसीमध्ये त्यांची लोकप्रियता पाहिली आणि त्या ठिकाणी उपस्थित राहण्याचं भाग्य मिळाल्याचाही अभिमान वाटलं.
मोदींना ज्या ज्या वेळी भेटतो त्यावेळी हरिवंशराय बच्चन यांच्या अग्निपथ कवितेची आठवण येते असं एकनाथ शिंदे म्हणाले. ते म्हणाले की, मोदींच्या चेहऱ्यावर मी कधीही थकवा आणि उदासी पाहिली नाही. त्यांची राजकीय प्रवास हा अग्निपथ कवितेप्रमाणे आहे. 2014 पूर्वी एकदाही कोणताही पंतप्रधान कल्याणमध्ये आला नव्हता. मोदी मात्र तीन वेळा कल्याणमध्ये आले. भिवंडी, ठाणे आणि कल्याण आपण जिंकलोय.
ही निवडणूक देशाचं भवितव्य घडवणारी आहे, देशाचा विकास आणि प्रगती घडवणारी आहे असं एकनाथ शिंदे म्हणाले. ते म्हणाले की, देशाला महासत्तेकडे घेऊन जाणारी ही निवडणूक आहे. कपिल पाटील, श्रीकांत शिंदेंना मत म्हणजे मोदींना मत. भरकटलेले विरोधक हे मोदींच्या नावे शिव्या देतात. पण एक अकेला मोदी अनेकांना भारी पडतोय. जो केहता है, वो करता है, त्यालाच मोदी म्हणतात. ‘प्राण जाए पर वचन ना जाए’ या प्रमाणे ते काम करत असून त्यांनी 370 कलम हटवलं, राम मंदिर बांधलं. मोदीजी प्रत्येक सभेत भारताच्या उज्ज्वल भवितव्याचं व्हिजन मांडतात.
दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळणारे मोदी, पाकिस्तानला धडा शिकवणारे मोदी. त्यामुळे देशातील 140 कोटी जनतेने त्यांना पु्न्हा एकदा पंतप्रधान करण्याचं ठरवलं आहे असं एकनाथ शिंदे म्हणाले. ठाकरेंनी पाकिस्तानची हुजरेगिरी सुरूकेली, त्यांच्या प्रचारात पाकिस्तानचे झेंडे पाहायला मिळत असून 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी त्यांच्या उमेदवराच्या प्रचारात दिसतोय असा आरोपही त्यांनी केला.