“बाळासाहेब ठाकरेंच्या स्वप्नातील मुंबई साकारण्यासाठी”

0

‘रोड शो’नंतर पंतप्रधान मोदींची प्रतिक्रिया; मुंबईकरांचेही मानले आभार!

मुंबई – महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आज मुंबईत पंतप्रधान मोदी यांचा रोड शो आयोजित करण्यात आला होता. या रोडशोदरम्यान मोठ्या संख्येने महायुतीचे कार्यकर्ते उपस्थित होते. विशेष म्हणजे मुंबईत ज्याप्रमाणे गणेशोत्सवाला गर्दी उसळते तशीच गर्दी पंतप्रधान मोदींच्या रोड शो दरम्यान बघायला मिळाली. यावेळी महिला, वृद्ध आणि लहान मुलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. दरम्यान, या रोडशोनंतर आता पंतप्रधान मोदींनी मुंबईतील जनतेचे आभार मानले आहे. तसेच दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्वप्नतील मुंबई घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे, असेही ते म्हणाले. एक्स या समाज माध्यमावर पोस्ट करत त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.

“मुंबईतील भव्य अशा रोड शोमध्ये सहभागी झालेल्या आणि आम्हाला आशीर्वाद द्यायला आलेल्या प्रत्येकाचे विशेषतः महिला आणि बालकांचा मी आभारी आहे. मुंबईबरोबर आमच्या पक्षाचा अतिशय घनिष्ठ संबंध आहे. याच शहरात १९८० साली आमच्या पक्षाची स्थापना झाली होती. त्यामुळे ही बाब आमच्या बांधिलकीला अधिकच बळकट करते”, अशी प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली. “उत्तम पायाभूत सुविधा आणि अधिक चांगल्या प्रकारचे ‘सुलभ राहणीमान’ या गोष्टी आमच्या दृष्टीने मुंबईच्या विकासाच्या केंद्रस्थानी आहेत. त्यामुळेच या महानगरातल्या लोकांसाठी मोठ्या प्रमाणावर विकासकामे सुरू झाली आहेत, ज्यामुळे भारताच्या वृद्धीला लक्षणीय ऊर्जा मिळत आहे”, असेही ते म्हणाले.

“या शहराला जोडणाऱ्या संपर्कव्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी आणि शहरातील कोंडी कमी करण्यासाठी अलीकडेच अटल सेतूचे राष्ट्रार्पण करण्यात आले. या प्रकल्पाची अगणित लोकांनी प्रशंसा केली आहे. याशिवाय मुंबईच्या जनतेला फायदेशीर ठरणाऱ्या इतर प्रकल्पांमध्ये सांताक्रूझ चेंबूर लिंक रोड आणि कुरार भूमीगत मार्ग प्रकल्प यांचा समावेश आहे. आमचे सरकार शहरातील रस्त्यांचे एकंदर जाळे सुधारण्यासाठी सक्रियतेने काम करत आहे. या प्रकल्पांबरोबरच इतरही प्रकल्पांचा येथील लोकांना मोठ्या प्रमाणावर फायदा होणार आहे”, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech