(सुनील जावडेकर)
ठाणे – महायुतीच्या सर्व प्रचार सभांमध्ये मग ते पंतप्रधान मोदींची प्रचार सभा असो, उपुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा असो की मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांची प्रचार सभा असो प्रमोद हिंदुराव यांनी त्यांच्या अस्खलित रोखठोक आणि परखड भाषेमध्ये अत्यंत कमी शब्दात पण मार्मिक अभ्यासू भाषण केले. इतर नेत्यांप्रमाणे ते नेत्यांचे केवळ गुणगान गात बसले नाहीत तर मतदार संघातील जिल्ह्यातील आणि अगदी तालुक्यातील मूलभूत प्रश्नांना देखील या सरकारी नेत्यांसमोर जोरदारपणे वाचा फोडली. अशा मोठ्या सर्वोच्च नेत्यांसमोर मतदारसंघाचे जिल्ह्याचे आणि तालुक्याचे महत्त्वाचे प्रश्न कसे मांडावेत आणि अशा सुवर्णसंधीचा उपयोग स्वतःच्या नेतृत्वाच्या विकासाबरोबरच मतदार संघातील प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी कसा करून घ्यावा हे कोणत्याही कार्यकर्त्याने, नेत्याने प्रमोद हिंदुराव यांच्याकडून आत्मसात करावे.
प्रमोद हिंदुराव हे ठाणे जिल्ह्यातील मोठे नाव आहे आहे. 1996 – 97 मध्ये महाराष्ट्रात शिवसेना-भाजप युतीचे सरकार असताना कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यक्रमासाठी त्यांनी शरद पवार यांना आमंत्रित करून प्रचंड भव्य असा कार्यक्रम घडवून आणला होता. त्यावेळी प्रमोद हिंदुराव हे ठाणे जिल्ह्यातील एकमेव असे नेते होते की राज्यात अन्य कृषी उत्पन्न बाजार समिती या काँग्रेस राष्ट्रवादीकडे अर्थात त्यावेळच्या विरोधी पक्षाकडे असल्यामुळे त्या सत्ताधारी शिवसेना-भाजप सरकारने बरखास्त केल्या होत्या. तथापि याला अपवाद केवळ कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीचा होता आणि या बाजार समितीचे अध्यक्ष होते प्रमोद हिंदुराव. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार तसेच सध्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार अशा दोघाही काका पुतण्यांशी अत्यंत घनिष्ठ , कौटुंबिक आणि आपुलकीचे असलेले संबंध ही प्रमोद हिंदुराव यांच्या आजवरच्या राजकारणातली सर्वात मोठी जमेची बाजू आहे. याच स्नेहसंबंधांमधून त्यांना 2014 पूर्वी महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे सरकार असताना सिडकोचे अध्यक्ष पद भूषवायला मिळाले होते. अर्थात दोन अडीच वर्ष सिडकोचे अध्यक्ष असतानाही आणि त्यानंतर महाराष्ट्रात व देशात सत्तांतर होऊन भाजपचे एक हाती सरकार आल्यानंतरही प्रमोद हिंदुराव यांनी सिडकोचा कारभार ज्या प्रकारे केला त्यामध्ये एकही नियमबाह्य काम राजकीय विरोधक शोधून काढू शकले नाहीत. स्वतःच्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत त्यांनी सिडकोचा कारभार अत्यंत पारदर्शीपणाने केला याची ही पोचपावती म्हणावी लागेल.
अर्थात प्रमोद हिंदुराव यांनी शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्याशीही घनिष्ठ नाते जोपासले. आणि त्याचबरोबर राज्यातील आणि केंद्रातील भाजप नेत्यांशीही त्यांची सलगी कायमच राहिली. इतकेच नव्हे तर सर्व सिनेमा रसिकांवर मोहिनी घालणाऱ्या ड्रीम गर्ल व मथुरेच्या भाजप खासदार हेमामालिनी आणि कोट्यावधी रसिकांच्या हृदयाची धडकन असलेल्या रेखा यांना एकत्र एकाच कार्यक्रमात आणून त्यांनी स्वतःमधील निखळ, निराल्लस कलारसिकाचे दर्शनही कलाप्रेमीना घडवले आहे.
गेली साधारण 35 – 40 वर्ष प्रमोद हिंदुराव हे ठाणे जिल्ह्याच्या तसेच काँग्रेस राष्ट्रवादीच्या आणि आता अजित पवार यांच्याकडे असलेल्या राष्ट्रवादी पक्षाच्या राजकारणाशी संबंधित आहेत. परखड रोखठोक मात्र स्पष्टवक्तेपणा हा त्यांचा स्थायी राजकीय स्वभाव आहे. मुरबाड आणि मुरबाड मधील ग्रामस्थ यांच्यावर हिंदुराव यांचे मनस्वी प्रेम आहे. त्यामुळेच त्यांना मुरबाड मधून यश मिळो अथवा न मिळो मुरबाडच्या स्थानिक ग्रामस्थांच्या समस्या मांडण्यात आणि त्या कशा सुटतील याकडे हिंदुराव यांचा सातत्याने कटाक्ष असतो. परवाच्या मुरबाड येथील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या महायुतीच्या कार्यकर्त्या मेळाव्यात देखील प्रमोद हिंदुराव यांनी फडणवीस यांना त्यांच्या उजव्या आणि डाव्या हाताला बसलेल्या महायुतीचे उमेदवार कपिल पाटील आणि मुरबाडचे आमदार किसन कथोरे यांच्यामध्ये मनोमिलन घडवून आणले तर भिवंडी च खासदार सहजगत्या महायुतीचा निवडून येईल असं जाहीरपणे सुचवण्याचे धाडस देखील प्रमोद हिंदुराव हेच करू शकतात. लोकसभा निवडणुकांच्या प्रचार सभांच्या निमित्ताने राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष म्हणून प्रमोद हिंदुराव यांना ठाणे कल्याण भिवंडी या लोकसभा मतदारसंघांमध्ये प्रचार सभांमध्ये राष्ट्रवादीचे नेते म्हणून सातत्याने बोलण्याची संधी मिळाली. या मिळालेल्या सुवर्णसंधीचा पुरेपूर वापर करत हिंदुराव यांनी ठाणे कल्याण भिवंडी मुरबाड येथील समस्यांना जोरदारपणे वाचा फोडण्याचे काम केले.
कालच्या कल्याण येथील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भिवंडी आणि कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या प्रचार सभेत प्रमोद हिंदुराव आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना श्रीकृष्णाची मूर्ती भेट देऊन त्यांचा सन्मान केला.