मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुरुवारी मुंबईमधील घाटकोपरमध्ये ‘रोड शो’च्या माध्यमातून शक्तीप्रदर्शन केलं. पंतप्रधानांच्या या ‘रोड शो’मुळे सकाळपासूनच मुंबईतील अनेक रस्त्यांवरील वाहतूक अंशत: किंवा पूर्णपणे बंद करण्यात आली होती. मोदींचा ‘रोड शो’ सायंकाळी पार पडला तरी सुरक्षेचा उपाय म्हणून दुपारी 2 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत घटाकोपर आणि आजूबाजूच्या परिसरातील अनेक रस्ते बंद करुन वाहतूक इतर मार्गांनी वळवण्यात आली होती. तसेच काही काळ मुंबई मेट्रोही सुरक्षेचं कारण देत बंद ठेवण्यात आली होती. मात्र आता याच मुद्द्यावरुन उद्धव ठाकरे गटाने मुंबईकरांना अशाप्रकारे वेठीस ठरुन पंतप्रधानांना आर्थिक राजधानीमध्ये प्रचार करण्याची गरज होती का? असा सवाल उपस्थित केला आहे.
“अलीकडे श्रीमान मोदी हे महाराष्ट्रात जवळ जवळ मुक्कामी असल्यासारखेच आहेत. एकट्या बुधवारच्या दिवशीच पिंपळगाव, बसवंत, कल्याण, भिवंडी, मुंबईतले ‘रोड शो’ अशा त्यांच्या जंगी कार्यक्रमांचे आयोजन केले गेले. मुळात मोदी हे दिल्ली सोडून सतत महाराष्ट्रात येत आहेत ते पराभवाच्या भीतीने. मोदी हे प्रतिशिवाजी आहेत व छत्रपती शिवरायांप्रमाणे ते महाराष्ट्रात पुन्हा वर्चस्व प्रस्थापित करतील अशा भ्रमात त्यांचे लोक असतील तर ते तितकेसे खरे नाही. मोदी हे मुंबईत राजकीय रोड शोसाठी येत असले तरी पंतप्रधानपदाचा लवाजमा घेऊन आले व त्यांच्या रोड शोच्या निमित्ताने अर्धी मुंबई पोलिसांनी बंद करून ठेवली,” असा टोला ‘सामना’च्या अग्रलेखातून लगावण्यात आला आहे.
“अनेक रस्त्यांवरची वाहतूक दिवसभर बंद केली. काही मार्ग वळवले. मोदी जेथे जाणार तेथील दुकाने, टपऱ्या, लहान व्यवसाय बंद करण्यात आले. रिक्षावाले, टॅक्सीवाले यांच्या पोटावर मारून त्यांना तेथे फिरकू दिले नाही. आजूबाजूच्या अनेकांच्या खिडक्या बंद करून ठेवण्यास सांगितले. मुंबई मेट्रो सेवादेखील संध्याकाळी अचानक बंद केली. त्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. लोकांना अशा प्रकारे वेठीस धरून कार्यवाहक पंतप्रधानांना मुंबईत प्रचार करण्यासाठी रस्त्यावर उतरण्याची गरज आहे काय?” असा सवाल ठाकरे गटाने उपस्थित केला आहे.