जालना – मराठा आरक्षणासाठी लढणारे कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे आणि भारतीय जनता पार्टीच्या बीड लोकसभेच्या उमेदवार पंकजा मुंडे या बहिण-भावावर टीका केली आहे. तसेच त्यांना निर्वाणीचा इशारा दिला आहे. जरांगे पाटील यांनी दावा केला आहे की “मुंडे बंधू-भगिनींचे कार्यकर्ते मला जिवे मारण्याच्या धमक्या देत आहेत. दोघेही आपापल्या कार्यकर्त्यांना माझ्याविरोधात समाज माध्यमांवर पोस्ट टाकायला सांगत आहेत. मला त्या कार्यकर्त्यांना सांगायचं आहे की तुमच्या नेत्यांनाही महाराष्ट्रभर फिरायचं आहे हे लक्षात ठेवा.”
मनोज जरांगे पाटील म्हणाले, “मराठा समाजावर खूप आधीपासून अन्याय होत आला आहे. मराठा समाजाची मतं घ्यायची, त्यांच्या जीवावर मोठ व्हायचं आणि नंतर त्याच मराठा समाजाला संपवायचं हे धोरण या राजकारणांनी गेल्या अनेक वर्षांपासून राबवलं आहे. बीडमध्ये आमच्या बांधवांना मारहाण झाली आहे. मी या घटनेचा निषेध करतो. मराठा समाजाचं पाठबळ घ्यायचं, या पाठबळावर निवडून यायचं आणि मग मराठा समाजाला संपवायचं हे त्यांचं धोरण आहे. आधी त्यांचा जीवावर मोठं व्हायचं आणि मग त्यांचा जीव घ्यायचा. मला या लोकांना सांगायचं आहे की, तुम्हाला आमचा जीव हवाच असेल तर आम्ही देखील जीव द्यायला तयार आहोत,कारण सध्या आमचाही नाईलाज आहे.”
मनोज जरांगे पाटील म्हणाले, “मला त्या दोन्ही बहिण भावाला सांगायचं आहे, तुम्हाला आमचा जीव घ्यायचा असेल तर खुशाल घ्या, आम्ही देखील जीव द्यायला तयार आहोत. परंतु, आम्ही मागे हटणार नाही. मराठा समाजाला आरक्षण मिळवून दिल्याशिवाय आम्ही मागे फिरणार नाही. बीडमध्ये मराठा तरुणांना झालेल्या मारहाणीची पोलिसांनी दखल घ्यावी त्या मुलांच्या अंगावर तलवारीचे वार करण्यात आले आहेत. त्यांना आई-बहिणीवरून शिवीगाळ झाली आहे. मी पोलीस अधीक्षकांना विनंती करतो की त्यांनी या प्रकरणाची दखल घेऊन कारवाई करावी.