मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून हिंदूहृदयसम्राट होण्याचा प्रयत्न सुरू आहे, अशी टीका राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे यांनी केली. ते लोकसत्ताच्या लोससंवाद कार्यक्रमात बोलत होते. त्यांनी राज्याच्या राजकारणातील विविध मुद्द्यांवर चर्चा केली.
“गेल्या १० वर्षांत काय केले हे सांगण्यासाठी भाजपाकडे कोणतेही मुद्दे नाहीत. प्रत्येक वेळी निवडणुका आल्यावर असे मुद्दे उकरून काढण्याची भाजपाला सवयच आहे. आमच्यावर ‘व्होट जिहाद’चा आरोप केला जातो. पण भाजपकडून ‘व्होट गद्दार’ केले जाते त्याचे काय?” असा सवाल ठाकरे यांनी केला.
“शिवसेनेला हिंदुत्व शिकविण्याचा कोणी प्रयत्न करू नये. मोदींना हिंदुहृदयसम्राट व्हायचे आहे. पण हिंदुहृदयसम्राट एकच व ते म्हणजे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे. जनतेने त्यांना ही पदवी दिली होती”, असं उद्धव ठाकरे म्हणाले. तसंच, भाजपा आणि संबंध परिवारात मूळ हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे होते. बाळासाहेब ठाकरे आता असते तर दुसरा हिंदूहृदयसम्राट बनण्याचा प्रयत्न झाला असता का? असा प्रश्नही त्यांना विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले, “हिंदुहृदयसम्राट होता येत नाही ही तर त्यांची पोटदुखी आहे. त्यातूनच त्यांनी शिवसेना फोडली. त्याच शिवसेनाप्रमुखांचे छायाचित्र वापरून मते मागण्याची वेळ भाजपा आणि मोदी यांच्यावर आली.”
तसंच, नुसतं बाळासाहेब बाळासाहेब करू नका. बाळासाहेब ठाकरे तुमचे वर्गमित्र होते का? तुम्ही हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब म्हणा”, असा सल्लाही त्यांनी भाजपाला दिला. “उद्या कोणी हिंदूहृदसम्राट होणार नाही, असं मी म्हणत नाही. पण बाळासाहेब ठाकरे नाटकं करून हिंदूहृदयसम्राट झाले नव्हते. जनतेने त्यांना सन्मानाने आणि प्रेमाने ही पदवी दिली होती”, असंही ते पुढे म्हणाले.