– मतदार राजा संतप्त, निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात नाराजी व्यक्त
कल्याण : निवडणूक आणि मतदार याद्यांचा घोळ हे समीकरण गेल्या कित्येक वर्षांमधील निवडणुकांपासून सुरू आहे, ते या निवडणुकीतही पाहायला मिळाले. कल्याण लोकसभेमध्ये 80 हजारांहून जास्त तर भिवंडी लोकसभेसाठी एक लाखांहून जास्त मतदारांची नावं गायब झाल्याचं दिसून आले. महाराष्ट्रातील पाचव्या आणि अखेरच्या टप्प्यात आज, सोमवारी सकाळी मतदान करण्यासाठी अनेक नागरिक मोठ्या उत्साहात मतदान केंद्रांवर पोहोचले होते. त्यांचे मतदान ओळखपत्र त्यांच्याजवळ होते, पण मतदार यादी तपासली असता त्यांचं नावच मतदार यादीत नव्हतं. अनेकदा मतदार याद्या चाळूनही त्यात नाव न मिळाल्याने अनेक मतदारांनी आपली नाराजी व्यक्त केली. कल्याण पश्चिमेकडील मुंबई विद्यापीठाच्या उपकेंद्रात असलेल्या मतदान केंद्रात या नागरिकांनी जोरदार घोषणाबाजी करत निवडणूक आयोगाविरोधात निदर्शने केली.
यावर प्रतिक्रिया देताना शिंदे गटाचे कल्याण शहर प्रमुख रवी पाटील म्हणाले की, “कल्याण भिवंडी लोकसभेत लाखो नागरिकांची नावे कमी केली आहे. जवळपास 1 लाख नावे मतदार यादीतून वगळली आहेत. मतदार राजा बोलत आहे आमचा मतदानाचा अधिकार हिरावून घेतला आहे. निवडणूक आयोगाने यावर कारवाई करावी. काही दिवसांनी पुन्हा निवडणुका येणार आहेत. या यादीमध्ये डीलिटेड म्हणून शिक्के मारुन दिले आहेत. अनेक नावांमध्ये बदल झाले आहेत.”
मतदार यादीमधून हजारो, लाखो नागरिकांची नावे वगळली गेली असल्याने कल्याण लोकसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात उभे असलेल्या शिवसेना शिंदे गटाचे डॉ. श्रीकांत शिंदे आणि ठाकरे गटाच्या वैशाली दरेकर तसेच भिवंडीमध्ये महायुतीचे उमेदवार कपिल पाटील आणि महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश म्हात्रे यांच्या मतदानावर मोठा परिणाम होऊ शकतो. मतदारयादीमधून नावे वगळण्यात असल्याने अनेकांनी निवडणूक निर्णायक अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. पण निवडणुकीमुळे आचारसंहिता लागू आहे, त्यामुळे यावर बोलता येत नसल्याची प्रतिक्रिया अधिकाऱ्यांनी दिली.