पटियाला : बांगलादेशविरोधात युद्ध झाले, तेव्हा 90 हजारांहून अधिक पाकिस्तानी सैनिक आपल्या ताब्यात होते. त्यावेळी मी पंतप्रधान असतो, तर करतारपूर साहिब परत घेतल्याविना पाकिस्तानी सैनिकांना सोडले नसते असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. पंजाबच्या पटियाला येथे आयोजित सभेत पंतप्रधान बोलत होते.
यावेळी मोदी म्हणाले की, आमच्या सरकारने अफगाणिस्तानात अडकलेल्या भारतीयांना सुखरुप परत आणले. काँग्रेसने सत्तेसाठी देशाचे विभाजन केले. फाळणीही अशा प्रकारे केली की, करतारपूर साहिब पाकिस्तानात गेले. तसेच 1971 च्या युद्धानंतर पाकिस्तानचे 90 हजारांहून अधिक सैनिक भारताच्या ताब्यात होते. त्यावेळच्या सरकारला हवे असते तर करतारपूर साहिब परत घेता आले असते, पण तसे झाले नाही. त्यावेळी मी असतो, तर आधी करतारपूर साहिब परत घेतले असते. आमच्या सरकारमुळे करतारपूर कॉरिडॉरचा मार्ग मोकळा झाला. त्यापूर्वी दूरवरुनच दर्शन करावे लागत होते असे मोदींनी सांगितले.
यावेळी त्यांनी पंजाबमधील आम आदमी सरकारवर जोरदार हल्लाबोल चढवला. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान हे केवळ कागदी घोडे नाचवत आहेत, ते मुळात कागदावरच मुख्यमंत्री आहेत. पुढे मोदी यांनी इंडिया आघाडीवर देखील हल्लाबोल केला. मी आज गुरुंच्या भूमीवर आशीर्वाद घेण्यासाठी आलो आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. देशाच्या रक्षणासाठी असो की देशाच्या विकासासाठी शीख समाजाने नेहमीच पुढे काम केले आहे. इथल्या जनतेने देशाचा विकास शेतीपासून उद्योजकतेपर्यंत केला आहे, पण कट्टर भ्रष्ट लोकांनी पंजाबचे काय केले आहे. येथील औद्योगिक व्यवसाय स्थलांतरित होत आहेत. अमली पदार्थांचा व्यापार फोफावत आहे.राज्य सरकारचे आदेश येथे चालत नाहीत. वाळू उत्खनन माफिया, ड्रग्ज माफिया आणि शूटर टोळ्यांचे अत्याचार येथे सुरू आहेत. संपूर्ण सरकार कर्जावर चालत आहे. सगळे मंत्री मस्ती करत आहेत आणि जे कागदी मुख्यमंत्री आहेत त्यांना दिल्ली दरबारात हजर राहायला वेळ नसल्याटी टीका मोदींनी केली.