मुंबई : लोकसभा निवडणुकीत पक्षविरोधी वक्तव्य आणि संभ्रम निर्माण केल्याप्रकरणी गजानन किर्तीकर यांच्यावर पक्षांतर्गत कारवाईची शक्यता व्यक्त केली जात आहे. शिवसेना नेते शिशिर शिंदे यांनी आज शिवसेना पक्षाचे मुख्य नेते, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्र लिहून किर्तीकर यांची पक्षातून हाकालपट्टी करण्याची मागणी केली आहे. दरम्यान किर्तीकर यांनी यावर भूमिका मांडत शेवेटपर्यंत शिंदेसोबत राहणार असल्याचे स्पष्ट केले. मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार रविंद्र वायकर जिंकले काय, हरले काय यात माझा काय दोष. मतदारांनी जे ठरवले आहे ते होईल. मात्र, येथे अमोल किर्तीकर जिंकला तर वडिल म्हणून नक्कीच आनंद होईल, अशा शब्दांत शिवसेनेचे ज्येष्ठ नेते गजानन किर्तीकर यांनी ठणकावले.
शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदेसोबत गेलो आणि कुटुंबात एकटा पडलो, असे विधान गजानन किर्तीकर यांनी केले होते. तसेच महाविकास आघाडीला लोकसभा निव़डणुकीत चांगल्या जागा मिळतील, असा दावा करत किर्तीकरांनी महायुतीत खळबळ उडवून दिली. या प्रकरणी ठाकरेंची बाजू घेणाऱ्या किर्तीकरांची हकालपट्टी करा, अशी मागणी शिवसेना उपनेते शिंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली. किर्तीकरांनी यावर परखड भूमिका मांडली.
वायकर यांची उमेदवारी निश्चित झाल्यापासून सोबत काम केले. पूर्वतयारी पासून आजवर जेवढ्या सभा झाल्या, तेथे हजर राहिलो. कोल्हापूर, नाशिक आदी ठिकाणच्या उमेदवारांचा प्रचार केला. तरीही काही गोष्टींचा विपर्यास केला गेला. याचा प्रचंड त्रास होतो आहे. कुणाच्याही जीवनात अशी वेळ येऊ नये, अशी खंत किर्तीकरांनी व्यक्त केली.
उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात पक्ष भरकटल्याने एकनाथ शिंदेनी केलेल्या उठावाला साथ दिली. पक्षाला बळ देण्याचा प्रयत्न केला. तरीही शिशिर शिंदे यांनी हाकलपट्टीसाठी पत्र लिहिले. शिशिर ध्येयवादी आणि संवेदनशील शिवसैनिक आहे. त्याने भूमिका मांडली. मात्र शिंदेंसोबत शेवटपर्यंत राहणार, असा दावा किर्तीकरांनी केला.
शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर शिंदेंसोबत जाऊ नये, अशी कुटुंबियांची भावना होती. परंतु, शिंदे भवितव्य घडवणारा नेता आहेत, असे किर्तीकर म्हणाले. दरम्यान मतदार संघात कोण जिंकेल, असा प्रश्न विचारला असता, वायकर हरला काय जिंकला काय यात माझा काय दोष, मतदारांनी जे ठरवले आहे, ते होईल. मात्र, अमोल जिंकल्यास वडील म्हणून निश्चित आनंद होईल, असे किर्तीकरांनी स्पष्ट केले.