अमरावती – मागील दोन ते तीन वर्षांपासून महाबीजकडून सोयाबीन बियाण्यांची निर्मिती कमी झाली होती. यावर्षी मागील वर्षीच्या तुलनेत महाबीजने दुप्पटहून जास्त म्हणजेच ३ लाख ६५ हजार क्विंटल बियाणे तयार केले असून त्यापैकी सुमारे ५० टक्के साठा विविध जिल्ह्यात विक्रीसाठी रवाना केला आहे. उत्पादकता आणि गुणवत्ता वाढल्यामुळे यंदा बियाणे अधिक प्रमाणात तयार केल्याचे महाबीजच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
मागील दोन वर्षांपासून कपाशीला समाधानकारक भाव मिळत नसून कापूस वेचणीला आल्यानंतर अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे राज्यातील अनेक भागातील कापूस भिजला होता. त्यामुळे बाजारात पूर्वीच कमी असलेल्या दरापेक्षाही पाणी लागलेल्या कापसाला कमी दर मिळाला होता. दुसरीकडे सोयाबीनच्या तुलनेत कपाशीचा मशागत खर्च सुध्दा जास्त असतो. शिवाय कपाशी किमान ५ ते ६ महिन्यांचे पीक आहे. त्यामुळे यंदा खरीप हंगामात राज्यभरात सोयाबीनचे पेरणी क्षेत्र ४८ ते ४९ लाख हेक्टरपर्यंत राहणार असल्याचा कृषी अभ्यासकांचा अंदाज आहे.
दरम्यान, महाबीजने यंदा सोयाबीनच्या काही नवीन वाणांसह आठ ते दहा जुने वाण कायम ठेवले आहे. सोयाबीनसोबतच ५ हजार क्विंटल उडीद, १ हजार क्विंटल मूग, साडेपाच हजार क्विंटल तूर, ३४ हजार क्विंटल धान आणि १३०० क्विंटल ज्वारीचे बियाणेसुध्दा तयार केले.1 बियाणे विक्रीला आणण्यापूर्वी महाबीजकडून बियाण्यांची उगवण क्षमता चाचणी दरवर्षीच केली जाते.2 यावर्षी उगवण क्षमता चाचणीत तब्बल ८२ टक्के सोयाबीन ‘पास’ झाले आहे.
मागील वर्षी उगवण क्षमता ६० टक्के होती तर त्यापूर्वीच्या वर्षी केवळ ४० टक्के होती. 3 यंदा ८२ टक्के उगवण क्षमता असल्यामुळे बियाण्यांचे प्रमाण वाढण्याचे हे सुध्दा महत्त्वाचे कारण आहे.