गेमिंग झोनला अग्निशामक दलाची परवानगी नव्हती

0

राजकोट- राजकोटच्या टीआरपी गेमिंग झोन अग्नितांडवातील मृतांचा आकडा 33 वर पोहोचला असून याप्रकरणी गेमिंग झोनचा मालक सुभाष सोळंकी आणि व्यवस्थापक नितीन जैन यांना पोलिसांनी अटक केली आहे. या गेमिंग झोनला अग्निशामक दलाची परवानगी नव्हती. असे असताना इतकी वर्षे हा गेमिंग झोन कसा सुरू होता? हा प्रश्न आहे. त्यात 2 दिवसांपूर्वीच या गेमिंग झोनमध्ये शॉर्टसर्किट झाले होते. त्यामुळे हा गेमिंग झोन बंद ठेवण्यात आला होता. त्यानंतर 99 रुपये प्रवेश फी ठेऊन हा गेमिंग झोन सुरू करण्यात आला. त्यामुळे या गेमिंग झोनमध्ये लहान मुलांसह लोकांनी मोठी गर्दी केली होती.

गेमिंग झोनमध्ये जनरेटरसाठी 1000 ते 1500 लिटर डिझेल साठवले होते. त्यामुळेच आग आणखी भडकल्याचे प्राथमिक चौकशीत उघड झाले आहे. याप्रकरणाची चौकशी करण्यासाठी आयपीएस अधिकारी सुभाष त्रिवेदी यांच्या नेतृत्वात 5 अधिकाऱ्यांची एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. ही एसआयटी सर्व विभागांची चौकशी करण्यात असून 10 दिवसांत आपला चौकशी अहवाल देणार आहे. राजकोट गुन्हे शाखेने गेम झोनमध्ये बसवलेला डीव्हीआर जप्त केला आहे. वेल्डिंग करताना पडलेल्या ठिणगीमुळे आग वेगाने पसरल्याचे सीसीटीव्हीत दिसत आहे. गेम झोनमध्ये वेल्डिंगचे काम राहुल राठोड यांच्या देखरेखीखाली सुरू होते. राहुल हा मूळचा गोंडलचा आहे. पोलिसांनी त्याच्या घराची झडती घेतली, मात्र तो तेथे सापडला नाही. पोलीस त्याचा कसून शोध घेत आहे.

या घटनेनंतर राजकोट पोलीस आयुक्तांनी शहरातील सर्व गेमझोन तात्काळ बंद करण्याचे आदेश दिले आहेत. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि गृहमंत्री हर्ष सांघवी यांनी आज एम्स आणि गिरिराज रुग्णालयात जाऊन जखमींची भेट घेतली आणि त्यांची तब्येतीची विचारपूस केली. त्यानंतर भूपेंद्र पटेल यांनी घटनास्थळाची पाहणी केली. गुजरात सरकारकडून मृतांच्या नातेवाईकांना 4 लाख रुपयांची आणि जखमींना 50 हजार रुपयांची आर्थिक मदत घोषित करण्यात आली आहे. दरम्यान मृतदेह नातेवाईकांच्या हवाली अद्याप केलेले नाहीत. मृतदेह इतके जळाले आहेत की, त्यांची ओळख पटू शकली नाही. डीएनए मॅच झाल्यानंतर दोन दिवसांनी नातेवाईकांना मृतदेह सोपवले जातील असे सांगण्यात येत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल एक्सवर पोस्ट करून शोक व्यक्त केला आहे. नरेंद्र मोदी म्हणाले की, राजकोटमध्ये लागलेल्या आगीच्या घटनेमुळे खूप दुःख झाले आहे. ज्यांनी आपल्या जवळील लोकांना गमावले आहे, त्या सर्वांसोबत माझ्या संवेदना आहेत. जखमींसाठी मी प्रार्थना करतो आहे. स्थानिक प्रशासन पीडितांना मदत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. या घटनेची स्वतःहून दखल घेत (स्पुओमोटो) गुजरात न्यायालयाने मानवनिर्मित आपत्ती असल्याचे म्हटले आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech