मुंबई – इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची नव्या उपक्रमानुसार आठवड्यातील प्रत्येक शनिवारी दप्तराविना शाळा भरणार आहेत. याची अंमलबजावणी २०२४-२५ या शैक्षणिक वर्षापासूनच होणार आहे. या संबंधित नुकताच आदेश शालेय शिक्षण विभागाने काढला आहे . या निर्णयामुळे पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना एकदिवस दप्तर न नेताच शाळेत जाता येणार आहे.
शालेय शिक्षण विभाग विद्यार्थ्यांवर मानसिक ताण वाढू नये, याची खबरदारी घेऊन वेगवेगळे उपक्रम राबवत आहे. याचाच एक भाग म्हणून सरकारने सकाळच्या सत्रात भरणाऱ्या शाळांची वेळ बदलली आहे. त्यामुळे लवकर भरणाऱ्या शाळा सकाळी ९ वाजता भरणार आहेत. त्याचबरोबर आता आठवड्यातील फक्त ५ दिवस म्हणजेच सोमवार ते शुक्रवारपर्यंत विद्यार्थ्यांना पुस्तके धडे देण्यात येणार आहेत. तर शनिवारी दप्तरविना विद्यार्थ्यांना शाळेत बोलवले जाईल.
पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना आठवड्यातील दर शनिवारी त्यांच्या आवडीच्या विषयांवर शाळा घेतली जाईल. यात कला, खेळ, ऐतिहासिक किंवा प्रेक्षणीय स्थळांना भेटी, स्काऊट गाइड, कथा सांगणे असे विविध उपक्रम राबवले जाते. म्हणजेच आठवड्यातील २ दिवस अभ्यासापासून विश्रांती घेतल्यानंतर मुले पुन्हा सोमवारी शाळेत येतील. यामुळे विद्यार्थ्यांची शाळेत येण्याची गोडी वाढेल. तसेच त्यांना अभ्यासाचा अधिक ताण जाणवणार नाही, असा शालेय विभागाचा हेतू आहे.