सॅक्रामेंटो – प्रसिध्द हॉलिवूड अभिनेता जॉनी वॅक्टर यांचा कॅलिफोर्नियातील लॉस एंजेलस शहरात काही चोरांनी केलेल्या गोळीबारात मृत्यू झाला. वयाच्या अवघ्या ३७ व्या वर्षी जॉनी यांनी अखेरचा श्वास घेतला. २५ मे रोजी पहाटे ३ वाजताच्या सुमारास चोरांनी वॅक्टर यांच्यावर हल्ला केला. या घटनेमुळे जॉनी वॅक्टर यांच्या कुटूंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. तसेच चित्रपटसृष्टीमध्येदेखील शोककळा पसरली आहे. या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून चोरांचा शोध सुरु आहे.
जॉनी वॅक्टर यांच्या आई स्कारलेट यांनी दिलेल्या माहितीनुसार, लॉस एंजेलस येथे २५ मे रोजी पहाटे ३ वाजताच्या सुमारास काही चोरांनी जॉनी वॅक्टर यांच्या गाडीमधून काही वस्तू चोरण्याचा प्रयत्न केला. यावेळी जॉनी गाडीमध्ये बसले होते. त्यांनी चोरांना कोणत्याही प्रकारे विरोध केला नाही. मात्र तरीही चोरांनी जॉनीवर गोळीबार केला. त्यानंतर चोरांनी घटनास्थळावरून पळ काढला. या गोळीबाराच्या घटनेत जॉनी गंभीर जखमी झाले होते. गोळ्यांच्या आवाजानंतर आजूबाजूच्या व्यक्ती घटनास्थळी पोहोचल्या. त्यांनी जॉनी यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच जॉनी यांचा मृत्यू झाला होता.
जॉनी वॅक्टर यांच्या हत्येबाबत पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलीस चोरांचा शोध घेत आहेत. जॉनी वॅक्टर यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना सोशल मीडियावर श्रध्दांजली अर्पण केली आहे. जॉनी यांनी एनसीआयएस, द ओए, वेस्टवर्ल्ड, द पॅसेंजर, स्टेशन १९, बार्बी रिहॅब, सायबेरिया, एजेंट एक्स, वँटास्टिक, अॅनिमल किंगडम, हॉलिवूड गर्ल, ट्रेनिंग डे इत्यादी कार्यक्रम आणि सीरीजमध्ये काम केले.