कोलकाता – बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या रेमल चक्रीवादळाने बांगलादेश आणि पश्चिम बंगललच्या किनारपट्टीला धडक दिली. या वादळात आतापर्यंत १६ जणांचा मृत्यू झाला असून घरांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मृतांमध्ये पश्चिम बंगालमधील ६ आणि बांगलादेशातील १० जणांचा समावेश आहे. रेमल चक्रीवादळामुळे पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवरील नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.
रेमल वादळामुळे सुमारे २९ हजार घरांचे नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे. तर अनेक ठिकाणी विजेचे खांब पडले. या चक्रीवादळामुळे सुमारे दहा लाख लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. रेमल चक्रीवादळामुळे कोलकातामध्ये अनेक रस्त्यांवर पाणी साचल्याने लोकांना त्रास सहन करावा लागला. कोलकत्यातील रेल्वे सेवा तीन तास बंद करण्यात आली होती. त्यामुळे लोकांना एका ठिकाणांहून दुसऱ्या ठिकाणी जाता येत नव्हते. या वादळाचा परिणाम बिहारमध्येही झाला. सोमवारी बिहारमधील नऊ जिल्ह्यांतील १० शहरांमध्ये मध्यम ते हलका पाऊस झाला. या काळात ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वारे वाहत होते. रेमाल चक्रीवादळामुळे पाटणासह ३१ शहरांच्या कमाल तापमानात घसरण झाली. ४ शहरांतील तापमानात वाढ झाली. १० शहरांमध्ये कमाल तापमान ४० अंशांपेक्षा जास्त होते.