आमदार संजय केळकर यांची पोलीस आयुक्तांशी चर्चा..
मुंबई – ठाण्यातील बेकायदेशीर पब, हुक्का पार्लर आणि डान्स बार प्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यांना जबाबदार धरण्यात येईल तसेच या अवैध व्यवसायांवर कारवाया करण्यासाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आल्याची माहिती आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी आमदार संजय केळकर यांना दिली.
पुणे येथील दुर्घटनेनंतर ठाण्यातील बेकायदेशीर डान्स बार, पब आणि हुक्का पार्लर पुन्हा चर्चेत आले असून आमदार संजय केळकर यांनी याबाबत पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांची भेट घेत ठोस कारवाया करण्याची मागणी केली. त्यावेळी त्यांच्या मागण्या मान्य करत श्री.डुंबरे यांनी अशा अवैध व्यवसायांना त्या-त्या विभागातील स्थानिक पोलीस ठाणे जबाबदार राहतील असे सांगून संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन श्री.केळकर यांना दिले.
गेल्या अडीच ते तीन वर्षांपासून आमदार संजय केळकर ठाण्यातील तरुण पिढ्यांना उद्ध्वस्त करणाऱ्या बेकायदेशीर डान्स बार, पब आणि हुक्का पार्लर या अवैध व्यवसायांविरुद्ध महापालिका आणि पोलीस प्रशासनाकडे पाठपुरावा करत आहेत. त्यांनी सुरू केलेल्या लोक चळवळीला नागरिकांचा मोठा पाठिंबा मिळत आहे. अधिवेशनातही त्यांनी यावर आवाज उठवला. त्यामुळे ठाण्यातील या अवैध व्यवसायांवर कारवाया झाल्या. मात्र त्यांनतर पुन्हा हे व्यवसाय सुरू होत असल्याचे आमदार संजय केळकर यांनी आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिले.
या भेटीत श्री.केळकर यांनी केलेल्या मागण्या मान्य करत श्री.डुंबरे यांनी यापुढे संबंधित पोलिस ठाण्यावर जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असे सांगितले. तर या अवैध व्यवसायांवर नियमित आणि ठोस कारवाया करण्यासाठी स्वतंत्र कक्ष सुरू करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
याबाबत आमदार संजय केळकर म्हणाले, ठाण्यातील तरुण पिढी उद्ध्वस्त होऊ नये यासाठी या अवैध व्यवसायांविरुद्ध लोकचळवळ सुरू केली आहे. त्याला मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे. मागील काळात काही पोलीस अधिकाऱ्यांनी याबाबत गांभीर्याने काम केले, परंतु काही ठिकाणी दुर्लक्ष झाले. त्यामुळे यावर ठोस कारवाया करण्यासाठी पोलिस आयुक्तांना भेटून अनेक मागण्या केल्या. त्या मान्य करून त्याची अंमलबजावणी तातडीने करणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले आहे.