पुणे – पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरण रोज नवे वळण घेत आहे. अपघातानंतर अल्पवयीन चालकाचे रक्ताचे नमुने ससुन रुग्णालयात पाठविण्यात आले होते. पण ते नमुने नष्ट करून दुसरा रिपोर्ट देण्यात आला. यामध्ये त्या चालकाने दारू न पिल्याचे सांगण्यात आले.
पोलिसांच्या तपासानंतर ज्यांनी रुग्णालयातील रिपोर्टमध्ये बदल केला त्या डॉक्टरांना अटक केली होती. डॉ. अजय तावरे, डॉ. श्रीहरी हळनोरचा समावेश होता. या दोघांचे वैद्यकीय शिक्षण विभागाच्यावतीने निलंबन आज निलंबन करण्यात आले. तसेच बीजे मेडिकल कॉलेजचे (ससुन रुग्णालयाचे) अधिष्ठाता डॉ. विनायक काळे यांना तत्काळ सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले आहे.
काळे यांच्या जागेवर अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, बारामती या ठिकाणचे अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत म्हस्के यांच्याकडे अतिरिक्त कारभार सोपवण्यात आला आहे. पुण्यातील ब्लड सॅम्पल अदलाबदल प्रकरण राज्यभरात चांगलेच गाजत आहे. ज्या डॉक्टरांनी हे कृत्य केले त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले असून ते अटकेत आहेत. रुग्णालयातील या प्रकाराची चौकशी करण्यासाठी एक एसआयटी समितीही नेमली आहे. पण या समितीच्या प्रमुख डॉ. पल्लवी सापळे यांच्यावरही भ्रष्टाचाराचे आरोप असल्यामुळे टीका होत आहे.
कल्याणीनगर अपघात प्रकरणातील बाळाच्या रक्ताचे नमुने बदलल्याप्रकरणी अटक झालेल्या दोन्ही डॉक्टरांना निलंबित करण्यात आले आहे. यात ससून रुग्णालयातील न्यायवैद्यकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. अजय तावरे आणि अपघात विभागातील वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीहरी हाळनोर यांचा समावेश होता. त्यांना बुधवारी निलंबित करण्यात आले. वैद्यकीय शिक्षण विभागाने बुधवारी हे आदेश काढले. न्यायवैद्यकशास्त्र विभागातील शिपाई अतुल घटकांबळे यालाही निलंबित केले आहे. आता काळे यांनाही सक्तीच्या रजेवर पाठवले आहे.