पुणे – शहरातील कल्याणीनगर पोर्शे कार अपघात प्रकरणात पोलिस कारवाई आणखी वेगाने होत आहे. आतापर्यंत पोलिसांनी १० पेक्षा जास्त जणांना याप्रकरणात अटक केली असून ससून रुग्णालयातील डॉक्टरांवरही कारवाई होत आहे. त्यातच, डॉ. अजय तावरेंचे निलंबन करण्यात आले असून ससूनचे डीन विनायक काळे यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले आहे. आता, याप्रकरणी पोलिसांकडून मुलाच्या आईचीही चौकशी होणार असल्याची माहिती आहे. त्यासाठी, पोलिसांकडून शिवानी अग्रवाल यांची विचारपूस केली असता, त्या घरात नसून बेपत्ता असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे, सोशल मीडियावरील व्हायरल व्हीडीओनंतर तो व्हीडीओ माझ्या मुलाचा नाही, हे सांगताना ढसाढसा रडणा-या शिवानी अग्रवाल कुठे गेल्या?, असा प्रश्न पोलिसांनाही पडला आहे.
पोलिसांकडून एकीकडे कारवाईला जोर आला असताना दुसरीकडे अग्रवाल कुटुंब पळ काढण्याचा प्रयत्न करत आहे. अपघातातील अल्पवयीन मुलासह आरोपी विशाल अग्रवाल आणि सुरेंद्र अग्रवाल यांना अटक करण्यात आली आहे. त्यानंतर, आता पोलिसांकडून मुलाची आई शिवानी अग्रवाल यांची देखील चौकशी होणार असल्याचे समजते. त्यातच, आता शिवानी अग्रवाल बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे. ड्रायव्हरला धमकावल्याप्रकरणी क्राइम ब्रांच टीमकडून शिवानी अग्रवाल यांचा देखील तपास करायचा आहे. त्यामुळे, पोलिसांचे पथक त्यांना ताब्यात घेईल, या भीतीने त्या सध्या बेपत्ता आहेत. तर, शिवानी अग्रवाल यांचा फोन देखील बंद आहे. त्यामुळे, मुलाची आई व विशाल अग्रवाल यांच्या पत्नी नेमके कुठे गायब झाल्या, असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे.