रायगड – आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात महाड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात अॅट्रॉसिटी कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धार्मिक भावना दुखावल्याचाही आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. बुधवारी महाड येथे मनुस्मृती दहन आंदोलनात आव्हाड यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडल्याचाही त्यांच्यावर आरोप आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी बुधवारी महाड येथील चवदार तळ्याचा जागी मनुस्मृती दहनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. आव्हाड यांनी चवदार तळ्यावर पाणी पिऊन मनुस्मृतीचा निषेध केला. या मनुस्मृती दहन आंदोलनात त्यांच्याकडून मनुस्मृती पुस्तकावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटोही फाडण्यात आला. यानंतर विरोधकांनी तीव्र संताप व्यक्त केला होता. आता त्यांच्यावर अॅट्रॉसिटी कायद्यातंर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जितेंद्र आव्हाड यांच्यावर महाड शहरातील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आव्हाड यांच्यासह एकूण २४ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शासनाच्या आदेशांचे आणि अटींचा भंग केल्याप्रकरणी जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या २३ कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आज महाड येथील चवदार तळ्यावर मनुस्मृती जाळून आंदोलन करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडला. त्याप्रकरणी विरोधकांनी त्यांच्यावर करवाई व्हावी, अशी मागणी केली होती. शिवाय महाड पोलिस प्रशासनाकडून आचारसंहितेच्या भंग म्हणून नोटीस दिली होती. मात्र आव्हाड यांनी आंदोलन केले, यानंतर त्यांच्यावर आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भा.दं.वि. कलम १८६० नुसार सेक्शन १८८, महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ नुसार सेक्शन ३७(१), महाराष्ट्र पोलिस अधिनियम १९५१ नुसार सेक्शन ३७(३), महाराष्ट्र पोलिस अधिनियम सेक्शन १३५ या कलमाअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.